आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. 31 डिसेंबरच्या रात्री अनेक ठिकाणी पार्टी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतू, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नववर्ष साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या संदर्भात राज्य सरकारने 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे.
सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना-
1. कोरोनाच्या अनुषंगाने दि.31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
2. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
9. तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.