आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीची घटना:हिंगोली अन विदर्भात दुकाने फोडून धान्य पळवणारे तिघे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; एक झायलो कारसह 12 लाखांचा ऐवज जप्त

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हसन उर्फ ईमी निसुरवाले याच्यावर घरफोडीचे 40 गुन्हे

हिंगोली सह विदर्भात दुकाने फोडून धान्य पळवणाऱ्या तिघांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी ता. 26 अटक केली असून त्यांच्याकडून झायलो कार सह 13 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अटक केलेले सर्व जण कारंजालाड (जि. वाशीम) येथील आहेत.

हिंगोली तालुक्यातील खानापूर येथे एका दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी त्यातील 18 कट्टे तुर चोरून नेली होती. त्यानंतर आखाडा बाळापूर, हिंगोली ग्रामीण, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकारानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी तातडीने गुन्हे शाखेला तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने पोलिस अधिक्षक कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, संभाजी लकुळे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकुर, प्रशांत वाघमारे, जयप्रकाश झाडे, सुमित टाले यांच्या पथकाने मागील दोन दिवसांपासून विदर्भात शोधमोहीम सुरू केली होती.

या पथकाने वाशीम जिल्हयातील कारंजालाड येथील हसन उर्फ ईमी निसुरवाले यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने गुन्हयांची कबुली दिली. फेरोजखान पठाण व मोईन उर्फ अण्णा (रा. कारंजालाड) यांच्या मदतीने या चोऱ्या केल्याची कबुली दिली असून त्यासाठी एक झायलो कार वापरल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी वरील दोघांनाही अटक केली असून झायलो कार व धान्याचे कट्टे असा 12 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले.

हसन उर्फ ईमी निसुरवाले याच्यावर घरफोडीचे 40 गुन्हे
या प्रकरणात हसन उर्फ ईमी हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे सुमारे ४० गुन्हे आहेत. या शिवाय तो अकोला जिल्हयातून हद्दपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...