आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:काठ्यांचा प्रसाद देणारे हात गरजूंना मदतही देऊ लागले; हिंगोलीत वाहतुक शाखेकडून दिव्यांग, वृध्दांसाठी वाहतुक व्यवस्था

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वाहतुक शाखेतर्फे एक महिन्यात तब्बल 700 पेक्षा अधिक वाहने जप्त, तर 16 लाखांचा दंड वसुल

हिंगोली शहरामध्ये विनाकारण भटकंती करणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद देणारे पोलिसांचे हात आता गरजूंच्या मदतीसाठीही पुढे येऊ लागले असून लॉककडाऊन वाढल्यामुळे दिव्यांग, जेष्ठ नागरीक व प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी वाहतुक विभागाने मोफत वाहतुकीची व्यवस्था केली आहे. या उपक्रमाचे उदघाटन शनिवारी (2 मे) पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते झाले आहे.

हिंगोली शहरात मागील काही दिवसांत विनाकारण भटकंती करणाऱ्यांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद दिला जाऊ लागला आहे. नागरीकांना घरातच थांबण्याबाबत वारंवार सुचना दिल्या जात असतांनाही काही जण मात्र दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन भटकंती करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वाहन जप्तीची मोहिम सुरु केली. यामध्ये एक महिन्यात तब्बल 700 पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहेत. तर 16 लाखांचा दंड वसुल केला आहे.

दरम्यान, शहरातील वाहतुक बंद झाल्याने दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरीक व गरोदर महिलेस रुग्णालयात जाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुक शाखेने त्यांची मोफत वाहतुक व्यवस्था सुरु केली आहे. त्यासाठी शहरात चार ॲटोद्वारे हि वाहतुक केली जाणार आहे. नागरीकांनी पोलिसांना दुरध्वनी केल्यानंतर अवघ्या दहा मिनीटात ॲटो त्यांच्या दारात पोहोचणार आहे. या उपक्रमाचे उदघाटन पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, उपाधिक्षक अश्‍विनी जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, आनंद मस्के, गजानन सांगळे, गजानन राठोड, शेषराव राठोड यांची उपस्थिती होती. पोलिसांच्या या उपक्रमामुळे अडचणीत सापडलेल्या नागरीकांना वाहतुकीसाठी मदतीचा हात मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...