आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:नागेशवाडी शिवारात गुंगीचे औषध देऊन ट्रक चालकाला लुटले, रोख रकमेसह 1 लाखाचा ऐवज पळवला

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारात देवळाण (ता.कन्नड) येथील एका ट्रक चालकाला पाण्याच्या बाटलीमध्ये गुंगीचे औषध देऊन रोख रकमेसह एक लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात रविवारी ता. ३१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील देवळाण येथील स्वप्नील विजय सुराशे (२३) हे त्यांच्या ट्रकमध्ये आईसक्रीमचे साहित्य घेऊन औरंगाबादकडून नांदेडला निघाले होते. शुक्रवारी ता. २६ परभणी येथे एक व्यक्ती त्यांना भेटला. त्याने आपणास नांदेडला जायचे आहे असे सांगितले. त्यावरून सुराशे यांनी त्यास ट्रकमध्ये सोबत घेतले. मात्र ट्रक काही अंतरावर आल्यानंतर त्या व्यक्तीने सुराशे यांना पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध दिले. त्यामुळे त्यांना गुंगी येत असल्याने त्यांनी ट्रक औंढा ते वसमत मार्गावर नागेशवाडी शिवारात थांबविला. सुराशे बेशुध्द झाल्यानंतर संबंधित भामट्याने त्यांच्या जवळील ९५७८५ रुपये रोख व एक सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला.

दरम्यान, सदर ट्रकला जीपीएस यंत्रणा असल्याने हा ट्रक एकाच जागेवर कसा काय उभा आहे याची शंका आईसस्क्रीम साहित्य पुरवठादाराला आली. त्यामुळे त्यांनी वसमत येथील एका विक्रेत्याला पाठवून खात्री केली असता ट्रक चालक सुराशे हे बेशुध्द असल्याचे दिसून आले. त्यांना उपचारासाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र ते शुध्दीवर येत नसल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले.

दरम्यान, रविवारी ता. ३१ ते शुध्दीवर आल्याने त्यांनी सविस्तर प्रकार आईसस्क्रीम साहित्य पुरवठादारास सांगितला. त्यानंतर या प्रकरणात हट्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार भुजंग कोकरे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...