आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटनाची घाई नडली:हिंगोलीत पालिकेच्या इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख नेत्यांनी फिरविली पाठ, स्वस्त धान्याचा गहू बनला चर्चेचा विषय

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या पालिकेच्या उद्घाटन कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेवरील अनेक मान्यवरांनी पाठ फिरवली. त्यातच या कार्याक्रमात कोविडच्या काळात देण्यात आलेला स्वस्त धान्याचा निकृष्ठ गहू चर्चेचा विषय बनला होता.

हिंगोली येथे नांदेड मार्गावर पालिकेच्या वतीने वैशिष्टपूर्ण योजनेतून सुमारे १० कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम घाईगडबडीत पार पाडण्याच्या चंग पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बांधला होता. त्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजेश नवघरे यांच्यासह इतर आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्षात शुक्रवारी (ता. १३) आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री प्रा. गायकवाड, भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या व्यतिरिक्त निमंत्रण पत्रिकेवरील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजेेश नवघरे, आमदार संतोष बांगर जिल्हयात असतानाही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पालकमंत्री प्रा. गायकवाड, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.

यावेळी प्रा. गायकवाड यांनी फर्निचर व इतर साहित्यासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र या इमारतीमधून पारदर्शक कारभार करून जनतेची कामे करावीत अशा कानपिचक्याही दिल्या. त्यामुळे निमंत्रितांनी फिरविलेली पाठ अन् पालकमंत्र्यांनी दिलेल्या कानपिचक्या चर्चेचा विषय बनला आहे.

स्वस्त धान्याचा निकृष्ठ गहू पाकलमंत्र्यासमोर दाखवला

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार शांताबाई मोरे यांनी कोविड काळात लाभार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचा गहू दिल्याची तक्रार केली. या गव्हाचे नमुनेही त्यांनी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांना दाखविले. तर पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी या धान्याच्या चौकशीच्या सुचना दिल्या. सदरील गहू प्रकरण देखील या कार्यक्रमात गाजले.

बातम्या आणखी आहेत...