आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेनगाव ते येलदरी मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून कोसळून दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ता. १२ पहाटे घडली आहे. सचिन पवार (२५ ) तेजस पाईकराव (२२, दोघे रा. खानापूरचित्ता ता. हिंगोली ) अशी मयत तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील सचिन पवार व तेजस पाईकराव हे दुचाकी वाहनावर सेनगावकडे गेले होते. आज पहाटेच्या सुमारास येलदरी मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या पाटीला धडक देऊन दोघेही दुचाकीसह पुलाखाली पडले. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, रणजित देशमुख, प्रवीण महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्याही खिशामध्ये ओळख पटविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीवरून एका क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. त्यावरून हे दोघे जण खानापूर चित्ता येथील असल्याचे स्पष्ट झाले.
खानापूर येथील पत्रकार अर्जुन पवार, दत्तराव पवार यांच्यासह गावकरी घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान शनिवारी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते दोघेही घरून निघाले होते अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. घटनास्थळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे जमादार अनिल भारती, शिवदर्शन खांडेकर यांचे पथक दाखल झाले आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारची नोंद झाली नव्हती.
दरम्यान सचिन पवार हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनी मध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो खानापूरचित्ता येथे गावी आला होता. महालक्ष्मीच्या सणासाठी तो गावी थांबला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तर तेजस पाईकराव हा सर्प मित्र होता त्यांना आतापर्यंत सुमारे दोनशे पेक्षा अधिक सापांना पकडून जीवदान दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.