आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:14 चाकी ट्रकने इंडिका कारला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

तळोदा3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळा ते डामरखेडा दरम्यान 14 चाकी ट्रकने इंडिका कारला दिलेल्या धडकेत तळोदा येथील दोन युवक ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे. गंभीर युवकाला धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक हा ट्रक सोडून फरार झाला. अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की अपघातग्रस्त इंडिकाचा पुढील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून संपूर्ण ऑइल रस्त्यावर सांडले होते.

गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहाद्या कडून तळोद्याकडे जाणारी इंडिका कार क्रमांक (एम एच 06 डब्ल्यू 6195) हिला प्रकाशा कडून येणाऱ्या 14 साठी ट्रक क् क्रमांक (एम एच 20 एजी 4100) यांच्यात समोरासमोर धडक होवून अपघात घडला. या अपघातात इंडिका कार चालक मोहित सुशील सूर्यवंशी (वय18) हा जागीच ठार झाला होता, तर त्याच्यासोबत चे वासुदेव संतोष जव्हेरी (वय19) व तेजस सुनील चित्ते हे गंभीर जखमी झाले.

भररस्त्यावर दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे त्यांना हृदयद्रावक चित्र दिसले. नागरिकांनी पोलिसांना खबर देण्यासह अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. यात इंडिका कारमधील मोहित सूर्यवंशी हा मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर उर्वरित वासुदेव व तेजसला नागरिकांनी शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी वासुदेव जव्हेरी याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तर दुसरा जखमी तेजस याच्या हातापायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करून शुक्रवारी सकाळी अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

लांबोळा ते डामरखेडा दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तिघे युवक हे तळोदा येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा शहादा येथे धाव घेतली. आज शुक्रवारी सकाळी मयताच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात येऊन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शहादा पोलिसात अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हवालदार सुनील पाडवी करीत आहेत.