आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रोचे लोकार्पण:कौरवांचे चाळे बघु न शकणारा हा धृतराष्ट्र नाही, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार प्रहार, मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''कोरोना काळानंतर राजकारणात आता नवीन एक साथ आली आहे. त्याच्या रोगाचे व व्हायरसचे निदान अजून झाले नाही. एक तर तुम्ही काही केले नाही तरीही आम्हीच केले अशी ओरड होते. आम्ही जर केले तर त्यात भ्रष्ट्राचार झाला अशी साथच राज्यात आली असून अशा रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज नाही." असा जोरदार प्रहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर केला.

''आम्ही काय करता - तु्म्ही काय करता हे जनता बघतच असते. कौरवांची चाळे बघु न शकणारा हा धृतराष्ट्र नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे'' अशा शब्दात त्यांनी श्रेयवादावरही पडदा टाकला.

मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांवरील सेवा मुंबईकरांच्या सेवेत गुढीपाडव्यापासून रुजू झाली. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मार्गावरील सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी केले. त्यानंतर श्री. ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविद्यालय काळापासून मी लोकलमध्ये प्रवास केलेला आहे. मी स्वतः लोकलचा अनुभव घेतलेला आहे. लोकलमध्ये आपला हात आपल्याच खिशात जात नाही हे नक्की, चुकुन दुसऱ्यांच्या खिशात गेला तर नको ती आफत. एवढी गर्दी मुंबईत वाढत आहे की, किती सुविधा द्यायच्या हा प्रश्न आहे. भुमीपूजन होते पण विकास काम पुढे जात नाही असे सांगत त्यांनी भाजपच्या काळातील कामांची खिल्ली उडवली.

अशा रुग्णांकडे लक्ष देऊ नका..

कोरोना काळानंतर राजकारणात आता नवीन एक साथ आली आहे, त्याच्या रोगाचे व व्हायरसचे निदान झाले नाही असा टोला भाजपला लगावत एक तर तुम्ही काही केले नाही तरीही आम्हीच केले अशी ओरड होते. आम्ही जर केले तर त्यात भ्रष्ट्राचार झाला अशी राज्यात साथ आली असून अशा रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज नाही असे ते म्हणाले.

भाजपने रातोरात झाडांची कत्तल केली

आम्ही काय करता, तु्म्ही काय करता जनता बघते. कौरवांची चाळे बघु न शकणारा हा धृतराष्ट्र नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. रातोरात झाडांची कत्तल कशी केली हे मुंबईकरांनी पाहिले. वाट लागली तरी चालेल पण घाईघाईने काम करायची असे काम भाजपचे आहे. आम्ही तसे काम करणारे नाही. हॉस्पिटल बांधणे हा विकास नाही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज येणार नाही हा विकास असतो असे म्हणत त्यांनी भाजपचे अप्रत्यक्ष कान टोचले.

केंद्र सरकार जमीन का देत नाही?

बुलेट ट्रेन हा एक प्रकल्प आहे. मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जमीन राज्य सरकारला का देत नाही. धारावीच्या पुर्नविकासाठी जमीन द्यायला तयार नाही आणि आम्ही विकास करीत नाही अशी ओरड केली जाते अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर केली. मागा आमची मर्जी असेल तेव्हा देऊ अशी केंद्राची निती आहे पण आम्ही भीक मागणारे नाही. ती वेळ आमच्यावर आणू नका. तुम्ही कामे अडवून ठेवली आम्ही काम पुढे नेत आहोत. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-नागपूर अशी हवी होती ती मुंबई-अहमदाबाद अशी का केली असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सरकार व राज्यातील विरोधी पक्षाला केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची गुढी उभारली जात आहे. नको त्या चर्चेला जास्त महत्व दिले जाते व लोकांचे लक्ष विचलीत केले जाते. पण केंद्र व राज्य सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विविध मुख्यमंत्री व मंत्री राज्याने बघितले. आम्ही सर्वजण आधी आघाडी सरकारमध्ये काम करीत होतो. सुरुवात व प्रकल्पाचा शेवट वेगवेगळ्या सरकारच्या काळात होतो. कुठलाही प्रकल्प सहज उभा राहत नाही त्यासाठी झोकून देऊन काम करावे लागते. आगामी काळात विकासाच्या अशाच गुढ्या उभारल्या जाणार आहे. मुंबईचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वाखाली काम सुरू आहेत. मुंबईकरांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

सुखाचे दिवस म्हणजे काय तर सार्वजनिक सुविधा भक्कम, परवडणाऱ्या किंमतीत आरोग्य सुविधा शिक्षण व अन्नधान्य हवे. कोरोनाच्या खाईतून राज्याला बाहेर काढतानाच विकास कामांना खिळ बसु नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वात काम केले. जनतेचे जगणे सोपे करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही अजित पवार म्हणाले. राजकारणातही अनेकजण बदलले. मुख्यमंत्री मातोश्रीवरून वर्षा बंगल्यावर आले, विकासाचा गाडा मात्र थांबणार नाही असेही ते म्हणाले. आगामी काळात 14 मेट्रो मार्गाचे नियोजन असून ठाणे ते मुंबईच्या अखेरच्या टोकापर्यंत मेट्रो नेण्याचा मानस सरकारचा आहे असेही ते म्हणाले.

मुंबईकरांनो पचकन थुंकु नका!

मेट्रोत कुठेही पचकन थुंकु नका असले धंदे करु नका. मेट्रोत घाण करू नका, बाहेर हात काढू नका. परदेशातील परिस्थिती पहा. तेथे गेल्यावर मुकाट व सरळ वागता इथे आवो जावो घर तुम्हारा असे आहे याचा फायदा घेऊ नका असा खोचक सल्लाही त्यांनी दिली.

यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 4 लाख कोटींची कामे राज्यात व मुंबईत करणार आहोत. मुंबईचे मुंबईपण विकास करताना हरवणार नाही याची काळजीही घ्यायची आहे. मुंबईकरांच्या श्रमाला योग्य मोल मिळेल असे शहर घडवायचे असून सर्वात सुरक्षित शहर मुंबई आहे. मुंबई बलिदानातून मिळवली ती जपण्याचा व वाढवण्याचा संकल्प आपण करूया असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येकवेळी मी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेत होतो. खूप कामे रखडलेली होती ती आम्ही पुढे नेत आहोत. पुणे लिंक रोड, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग अशी अनेक कामे करीत आहोत. शहरीकरण वाढत आहे. मोठे प्रकल्प होत असताना छोट्या कामांवरही लक्ष देत आहोत. दहा हजार इलेक्ट्रीक बस मुंबईच्या रस्त्यावर कशा धावतील यासाठी प्रयत्न करीत आहोत. मेट्रोची लाईन झाल्यानंतर ती बदलुू शकत नाही पण त्याखालील नियोजन करण्यासाठी जागतिक सिटी प्लॅनर्सकडून सल्ला घेणार आहोत असेही ते म्हणाले. काम पुढे नेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रासाठी कार्य करू अशी शपथही त्यांनी यावेळी घेतली.

गाडीचा ड्रायव्हर नसला तरी गाडी चालणार

एकनाथ शिंदे म्हणाले, गाडीचा ड्रायव्हर नसला तरी गाडी चालणार आहे. अत्याधुनिक पद्धतीची सिस्टिम या मेट्रोत आहेत. मेट्रोमध्ये अधिकारी चांगले काम करीत आहेत. मेट्रो बेस्टचे इंटीग्रेशन सेवा सुरु होतील कुठेही रांग लावायची गरज राहणार नाही. मोबाईलवरून बुकींग करता येईल. श्रेयवाद घाला चुलीत आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. आमची मक्तेदारी नाही. विलासराव देशमुखांपासून विकास कामे सुरु आहेत.

दाणे - दाणे पे लिखा है खाणे वालो का नाम, बदल सुरुच असतात परिवर्तन होत असते त्यामुळे श्रेय आम्ही घेत नाही. आ्म्हाला श्रेय न घेण्याचे बाळासाहेबांनी शिकवले आहे. त्यामुळे जनतेसाठी विकास करणे हाच ध्यास असायला हवा असेही ते म्हणाले.

मेट्रो 2 ए मार्गावरील 9 स्थानके आणि मेट्रो 7 मार्गावरील 10 स्थानके 2 एप्रिलपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले. मुख्यमंत्री मेट्रोस्थानकात पोहचल्यानंतर तिकीट काढून त्यांनी दहीसर ते डहाणुकरवाडी तसेच दहीसर ते आरे कॉलनी मार्गाचे लोकार्पण केले. तत्पुर्वी मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी मेट्रोला दाखविली. त्यानंतर मेट्रोने प्रवास केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नव्हते, कार्यक्रम पत्रिकेत नावही नसल्याने भाजपने या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता त्यांचा एकही नेता या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित नव्हता.

मेट्रोत प्रवास केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मुंबईकरांना मेट्रोमुळे लाभ मिळणार आहे. त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे, सरकार येतात सरकार जातात. स्वतः मुख्यमंत्री प्रमुख म्हणून काम करतात. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पात लक्ष घातले त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

किमान दर 10 रुपये कमाल दर 80 रुपये

मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.

मुंबईत मेट्रो -7 म्हणजेच रेड लाईन आणि मेट्रो -2 ए म्हणजेच यलो लाइनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. या दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली असली तरी मुंबई मेट्रोचे काम पूर्ण होण्यास अजून दोन ते अडीच वर्ष लागणार आहे असे एमएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 2 ए मध्ये एकूण 9 स्थानक आज सुरु झाले. यामध्ये दहिसर पूर्व,आनंद नगर,कंदार पाडा,मंडपेश्वर,एक्सर,बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर,कांदिवली पश्चिम,डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश. मेट्रोमुळे रिक्शा, टॅक्सी आणि वाहतूक कोंडीच्या कटकटीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

  • मेट्रो 7 मधील एकूण 10 स्थानकही आज गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू झाले. आरे,दिंडोशी,कुरार,आकुर्ली,पोयसर,मागाठाणे,देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान,ओवरी पाडा,दहिसर पूर्व या स्थानकांवरील सेवा सुरु झाली.
  • सुरुवातीच्या काळात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू राहतील. एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असतील. एका मेट्रोमधून 2280 प्रवासी प्रवास करु शकतात.
  • मेट्रो ट्रेन या चालक विरहित तंत्रज्ञान असलेल्या आहेत. आता सुरुवातीला चालकांद्वारे सेवा चालू करण्यात येतील. एका दिवसात 150 फेऱ्या होतील. तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी दिवसभरात प्रवास करतील, असा अंदाज आहे.
  • मेट्रो 3 चे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते अडीच वर्षे लागतील.
  • मेट्रो 2ए आणि मेट्रो 7 मुळे पश्चिम द्रुतगती मार्ग,एस व्ही रोड,लिंकिंग रोड वरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
  • मेट्रोचा तिकीट 10 ते 50 रुपये इतकं असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...