आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादमध्ये आणीबाणी:जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर संपल्याने रूग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला, कुठे गेले लोकप्रतिनिधी?

उस्मानाबाद, चंद्रसेन देशमुख9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयांकडून नातेवाइकांना इंजेक्शनसाठी पाठवले जात आहे बाहेर

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरेानाने हाहाकार सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण लोकसंख्येच्या तुलनेत झपाट्याने वाढत असून, मृत्यूचेही तांडव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना सुविधांही मिळणे कठीण झाले आहे. शनिवारी दुपारी शहरातील काही खासगी रूग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. काही रूग्णांना ऑक्सिजनशिवाय ठेवणे अशक्य झाल्याने खासगी रूग्णालयांनी गंभीर रुग्णांना सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा अजूनही तुटवडा असून, काही रूग्णांनी 10 हजार रुपये मोजून इंजेक्शन घेतल्याचे सांगितले. परिणामी रुग्णांसोबतच नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागला आहे. मात्र, असे असले तरी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर परिस्थितीत समोर येत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये अस्वस्थता आणि चीड निर्माण होत आहे.

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून, आतापर्यंत जिल्ह्यात 28 हजार रुग्ण आढळले आहेत. मात्र, सध्या सहा हजार रुग्ण उपचाराखाली आहेत. या परिस्थितीत काही रूग्ण गंभीर अवस्थेत जात असल्याने त्यांना रेमडेसिवीर तसेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाकडे सुविधांची उपलब्धता नसल्याने उपचार करताना अडचणी निर्माण होत आहेत.

शनिवारी दुपारी शहरातील काही खासगी रुग्णालयांनी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना अचानक ऑक्सिजन संपल्याचे सांगून इतरत्र हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाईक हतबल झाले. एकीकडे शहरात काेरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत. आहे त्या परिस्थितीत उपचार करतानाही सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांचे नातेवाईक हतबल होत आहेत.

समस्यांवर उपाय काय?

जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन टँक सहा महिन्यांपासून उभारणीच्या स्थितीतच आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडे आता सगळ्याच सुविधांची कमतरता जाणवत आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन जेमतेम आहे. ऑक्सिजनसह रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितली जात आहेत. मात्र बाजारातही इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजार जोरात सुरू आहे. शहरातील काही रूग्णांच्या नातेवाईकांनी 10 हजार रूपये मोजून इंजेक्शन मिळविल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑक्सिजन टँक उभारून पूर्ण झाले असते तर किमान जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन तुटवड्याची समस्या आली नसती. समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत, अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्री शंकरराव गडाख स्वत: कोरेाना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आलेच नाहीत. अन्य लोकप्रतिनिधींचे वजन कमी पडत असल्याने साधन सुविधांची कमतरता जाणवत आहे.

जालन्याला 10 हजार रेमडेसिवीर, उस्मानाबादला का नाही?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याला रेमडेसिवीरच्या 10 हजार इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्याला कोणीही वाली नसल्याची भावना असून, इंजेक्शनसाठी रूग्णांचे नातेवाईक जिल्ह्याबाहेर चकरा मारत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील स्थानिक मंत्री नसल्याने सरकारी स्तरावरून दुजाभाव होत असल्याची भावना आहे.

परिस्थिती चिंताजनक, आकड्यांचा खेळ
जिल्ह्यात शुक्रवारी 23 कोरेाना रूग्ण दगावले असून, अन्य 9 सारीच्या रूग्णांचा समावेश आहे. परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. साडेसोळा लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या रूग्णांची संख्या तुलनेने मोठी आहे. मात्र त्या प्रमाणात उपचाराच्या सुविधा उपलब्ध नाहीत. दुसरीकडे दररेाज मृत्यू पावणाऱ्या रूग्णांच्या आकडेवारीत घोळ समोर येऊ लागला आहे. एकीकडे आरोग्य प्रशासनाकडून जाहीर केले जाणारे आकडे आणि पालिकेकडे अंत्यसंस्कारासाठी दिले जाणारे आकडे यामध्ये गोंधळ होत आहे.

या परिस्थितीत आरोग्य प्रशासन, नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून काम करण्याची गरज असताना कुणाचा पायपोस कुणाला नाही, अशी स्थिती आहे.त्यामुळे रूग्णांच्या आणि नातेवाइकांच्या मनात मात्र चिड निर्माण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...