आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीचा झिंगाट कारभार:बियर बारच्या परवान्यासाठी गावाला स्वागत कमान बांधून देण्याची अट

सातारा / प्रतिनिधी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात बियरबार सुरू करायचा असेल तर संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असतो. अशाच एका परमिट रुम व बियरबारच्या परवानगीसाठी विरवडे (ता. कराड) ग्रामपंचायतीने गावाला स्वागत कमान बांधून देण्याची आणि बियरबारच्या जागेतून गावाला 20 फुटाचा रस्ता करून देण्याची अट घातली आहे. विरवडे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या या झिंगाट कारभाराची सध्या जोरदार चर्चा आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रकारच्या कामांना परवानगी देण्याचे जादा अधिकार नुकतेच ग्रामपंचायतींना मिळाले आहेत. त्यामुळे सरपंच व सदस्यांचे महत्व वाढले आहे. मात्र, गाव कारभारी अनेकदा नियमांच्या चौकटी मोडून शासनाने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करताना दिसतात. असाच कारनामा बिअरबारला परवानगी देताना पाहायला मिळाला आहे. ओगलेवाडी नजीकच्या विरवडे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत बियरबारला परवानगी देण्याचा ठराव मंजूर करताना गावची स्वागत कमान बांधून देण्याची आणि त्या मिळकतीतून रस्ता करून देण्याची अट घातली आहे. त्यामुळे ओगलेवाडी परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रोसिडींगमध्येही उल्लेख

विरवडे ग्रामपंचायतींचा धुंद कारभार प्रोसिडींगमध्येही पहायला मिळाला. बियरबारला परवानगीसाठी गाव कारभार्‍यांनी प्रस्तावकाला घातलेल्या स्वागत कमान आणि रस्ता करून देण्याच्या अटींचा प्रोसिडींगमध्ये उल्लेख केला आहे. त्यामुळे बियरबारला देण्यात आलेला परवानगीचा ठराव आता वादात सापडला असून विरवडे ग्रामपंचायतीचा अजब आणि तर्‍हेवाईक कारभार टिंगलीचा विषय बनला आहे.

दोन गावांच्या हद्दीचा वाद

वास्तविक ओगलेवाडी हे स्वतंत्र गावठाण आहे. १९७५ सालीच त्याचे तसे गॅझेट झाले आहे. त्यानंतर ओगलेवाडीतील काही सर्व्हे नंबर विरवडे गावठाणामधून कमी करण्यात आले आहेत. प्रस्ताविक बियरबारसाठी मागणी केलेली जागा ओगलेवाडी गावठाणात येत असताना विरवडे ग्रामपंचायतीने परवानगीचा ठराव मंजूर केला आहे. यावरून आता दोन गावांच्या हद्दीचा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परवानगी मागणारी व्यक्ती परजिल्ह्यातील

ज्या जागेत बियरबारला परवानगी देण्याचा ठराव घेण्यात आला आहे ती जागा १७ जून २००४ पासून एका कंपनीकडे तारण आहे. अशा जागेची नव्याने ग्रामपंचायतीने ८ अ ला नोंद कशी काय धरली? हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच बिअर बारला परवानगी मागणारी व्यक्ती ही परजिल्ह्यातील असताना त्या व्यक्तीचे गावच्या हद्दीतील वास्तव्य विरवडे ग्रामपंचायतीच्या कारभार्‍यांनी मान्य करून टाकले आहे.

परवानगी बेकायदेशीर असल्याची चर्चा

विरवडे आणि ओगलेवाडी गावांची स्वतंत्र गावठाणे आहेत. बिअरबारला परवानगी मागण्यात आलेली जागा ही ओगलेवाडी गावठाणात असताना विरवडे ग्रामपंचायतीने ठराव कसा घेतला, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्याची चर्चा सुरू आहे. विरवडे ग्रामपंचायतीने बियरबारला दिलेली परवानगी बेकायदेशीर असून त्या विरोधात कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे ओगलेवाडीचे माजी पोलिस पाटील मुकुंद पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...