आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:राजूरमध्ये भाविकांची सेवा करणारे स्वयंसेवक रुग्णसेवेसाठी सरसावले; रुग्णांच्या नातेवाइकांना आश्रय, प्रसादालयात अन्नछत्र

राजूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीटी स्कॅनशिवाय ऑक्सिजन पातळी तपासून उपचार

जालना जिल्ह्यातील राजूरचे (ता. भोकरदन) महागणपती पीठ साडेतीन पीठांपैकी प्रमुख पीठ. मोठी बाजारपेठ आणि गणपती देवस्थानामुळे राजूर पंचक्रोशीतील ५० गावांचे केंद्रस्थान बनले. देवस्थानामुळे दररोज दोन कोटींची उलाढाल होत असे. मात्र कोरोनामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे पाय थबकले आणि गावकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले. ‘देऊळबंद’ मुळे निराश न होता भाविकांची सेवा करणारे हे हात आता कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सरसावले. गावकऱ्यांची साथ आणि मंदिर विश्वस्तांच्या इच्छाशक्तीच्या बळावर १० हजार लोकसंख्येच्या या गावात ८० खाटांचे कोविड सेंटर उभारले गेले. आजवर सुमारे १४०० कोरोना रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले.

एखादा शहरासारख्या आरोग्य सुविधा या सेंटरमध्ये उभारल्या गेल्या हे येथे उल्लेखनीय. या कामी सरपंच भाऊसाहेब भुजंग, राहुल दरक, संस्थानाचे व्यवस्थापक गणेश साबळे, अप्पासाहेब पुंगळे, मनोज साबळे, हारुण सौदागर, अभिषेक पारवे, शोएब मुलतानी, प्रभात दरक, शेखर टाकळकर, अक्षय इंगेवार, कार्तिक पुंगळे, राम वारे, सतीश क्षीरसागर ही तरुण मंडळी परिश्रम घेत आहेत.

गावातच कोविड सेंटर
गावात रोज किमान २० रुग्ण निघू लागल्याने प्रत्येकाला जालन्यात जावून उपचार घेणे शक्य होत नव्हते. सरपंच, संस्थानातील सदस्य, जागरुक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे कोविड सेंटरसाठी पाठपुरावा केला आणि मागील सहा महिन्यांपासून गावातील ग्रामीण रुग्णालयाचेच कोविड सेंटरमध्ये रूपांतरण झाले. येथे ३० खाटांची व्यवस्था होती. आता तेथे ८० रुग्णांची सोय करण्यात आली. तीन व्हेंटिलेटर आणले. या कोविड सेंटरचा फायदा राजूरसह आजूबाजूच्या ५० गावांतील रुग्णांना होऊ लागला. फुलंब्री, मंठा, अंबड तालुक्यातूनही रुग्ण येऊ लागले. बदनापूरच्या शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे या केंद्राचा अतिरिक्त भार देण्यात आला.

व्यापारी राहूल रामविलास दरक म्हणाले, सात महिन्यांपूर्वी माझ्या काकांना कोरोनाची बाधा झाली. जालन्यातील खासगी रुग्णालयात दोनच दिवसांत ३८ हजारांचे बिल झाले. शेवटी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि ते बरे होऊन घरी परतले. या स्थितीत गरिबांचे काय, हा विचार करून आम्ही मित्रांनी गावात कोणालाही कोरोना झाला तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता सर्व मिळून त्याला आधार देण्याचा संकल्प केला.

दोन कोटींचा व्यवहार लाख-दोन लाखांवर
राजूरचे अर्थचक्र भाविकांवर अवलंबून आहे. कोरोनापूर्वी रोज २ कोटींची उलाढाल होत असे. मात्र एक वर्षापासून हे अर्थचक्र थांबले. आता दैनंदिन उलाढाल २ लाखांवर येऊन ठेपली. अनेक जण बेरोजगार झाले. या गावात ७० कृषी सेवा केंद्रे, ४० मेडिकल, २५ कापड दुकाने, २० हार्डवेअर, पाच छोटे मॉलही आहेत. ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न ४० लाखांच्या घरात आहे

हजारावर रुग्ण बरे होऊन परतले
या सेंटरमध्ये आतापर्यंत सुमारे ११०० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार झाले आहेत. यात सहा महिन्यांत केवळ सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या २२ वर्षांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा रुग्णांना फायदा होत आहे. या केंद्रात एचआरसीटी किंवा सीटी स्कॅन मशीन नसतानाही केवळ रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासून व एक्स-रे काढून रुग्णांच्या शारीरिक क्षमतेनुसार डॉ. वाडीकर औषधोपचार करीत आहेत.

हजारांमागे १ व्हेंटिलेटर
राजूरच्या कोविड सेंटरमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तीन व्हेंटिलेटर आहेत. सुदैवाने त्यांचा अधिक वापर करण्याची वेळ आलेली नाही. दरम्यान, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य आणि डॉ. वाडीकर यांनी प्रयत्न करून शासनाकडे आणखी ७ व्हेंटिलेटर मागवले असून त्यामुळे या सेंटरमध्ये हजार लोकांमागे एक व्हेंटिलेटरची सुविधा मिळणार आहे.

प्रसादालय झाले अन्नछत्र
संस्थानातील काही तरुणांनी प्रसादालयातच रुग्णांच्या नातेवाइकांसाठी अन्नछत्र सुरू केले. जेवणासोबत औषधी व इतर साहित्य मिळवून देण्यासाठी हे स्वयंसेवक प्रयत्न करतात.

नैसर्गिक ऑक्सिजन
कृत्रिम ऑक्सिजनपेक्षा नैसर्गिक ऑक्सिजनद्वारे आजारावर मात करता यावी यासाठी डॉक्टर ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवून उपचार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...