आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:विठूरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांचा गनिमी कावा, पोलिसांना गुंगारा देऊन वासकर दिंडी पंढरपुरात

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे पोलिसांकडून रस्त्यावर होणाऱ्या अडवणुकीमुळे गनिमी काव्याने श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर दिंडी बुधवारी (दि. ७) भूवैकुंठ पंढरीत दाखल झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांसह मानाचे दहा पालखी सोहळे गतवर्षीप्रमाणे यंदाही बसने आषाढी वारीसाठी इकडे येत आहेत.

राज्य सरकारने विवाह, निवडणुका, मेळावे, सभा, समारंभाप्रमाणे पायी वारीलाही परवानगी द्यावी, अशी वारकऱ्यांनी मागणी केली होती. वारकरी प्रतिनिधी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर, पांडुरंग महाराज घुले यांनी यासाठी आग्रह धरला होता. तसेच आपल्या निवडक वारकऱ्यांसह त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानानंतर चालायला सुरुवातही केली होती. परंतु दिघीजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना कराड येथे पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले.

पोलिसांना हुलकावणी देत दादा महाराज शिरवळकर दिंडी आळंदीहून निघाली. परंतु दिवे घाटात त्या दिंडीला पोलिसांनी अडवून अटक केली. दिंड्यांचे अटकसत्र सुरू असतानाच माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची तात्यासाहेब वासकर दिंडी पोलिसांना गुंगारा देऊन येथे पोहोचली. खांद्यावर भागवत धर्माची पताका, हाती टाळ, खांद्यावर वीणा आणि मुखी “रामकृष्ण हरी नामाचा जयघोष करीत ही दिंडी पंढरपुरात दाखल झाली. सात दिवसांत आळंदी ते पंढरपूर हे अंतर या दिंडीने पूर्ण केले. संचारबंदीपूर्वीच येथे येऊन दिंडीतील वारकऱ्यांनी चंद्रभागेचे स्नान केले. नामदेव पायरीसह कळसाचे दर्शन घेऊन नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.

धन्य झालो जगी, पावलो पंढरी
पंढरीची वारी हा आमचा कुळधर्म. परंतु शासनाने पायी वारीला बंदी घातल्याने यंदा चंद्रभागेचे स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा होते की नाही याची चिंता होती. तात्यासाहेब वासकर फडाने पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. माझ्यावर विण्याची जबाबदारी सोपवली. मी धन्य झालो. आळंदीपासून पायी येताना आता या पायी वारीतच मोक्ष मिळावा, ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. पंढरीच्या परमात्म्याने ही पायी वारी पूर्ण करून घेतली. मी धन्य झालो, त्याचा मला आनंद वाटतो, असे वासकर दिंडीचे विणेकरी अण्णा चोपदार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...