आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:सुप्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचे निधन, पेण येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साठोत्तरी काळातील महानगरीय संवेदना नेमकेपणाने कवितांमधून टिपणारे ज्येष्ठ कवी. अनुवादक, संपादक, लघुअनियतकालिके चळवळीतील अग्रणी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर (वय ७८) यांचे शनिवारी पहाटे कोकणातील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलाविश्वातील आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सतीश काळसेकर मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे या गावचे. त्यामुळेच त्यांचे आडनाव काळसेकर पडले. वाचन-लेखनाची आवड बालवयापासून जोपासणाऱ्या काळसेकर यांचे शिक्षण कोकण तसेच मुंबई येथे झाले. त्यांनी १९६५ ते २००१ या काळात बॅंकेत नोकरी केली. मात्र, त्यांचा पिंड साहित्यिकाचा होता. त्यांच्या ‘इंद्रियोपनिषद’ या पहिल्याच कवितासंग्रहाने (१९७०) जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर काळसेकर यांनी अविरत लेखन-संपादन- अनुवाद अशा क्षेत्रात मनमुराद मुशाफिरी केली. त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी सन्मानाने गौरवण्यात आले होते. लेनिनवरच्या कविता (अनुवाद आणि संपादन) हेही त्यांचे चर्चेतील कार्य होते.

साक्षात, विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. महाश्वेतादेवी तसेच रस्किन बॉॅंड या लेखकांच्या कथांचे अनुवादही त्यांनी केले. मागोवा, फक्त, तापसी, चक्रवर्ती, तात्पर्य, लोकवाड्मयगृह अशा नियतकालिकांसाठी त्यांनी संपादनाचे कार्य केले. साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) चे भारतीय पुरस्कार निवड समितीचे सभासद, निवड समितीचे निमंत्रक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, अशी पदेही त्यांनी भूषवली होती. सोव्हिएट लॅंड नेहरू पारितोषिकाचे ते मानकरी होते. काळसेकर यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, मल्याळम् भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘मी भयंकराच्या दारात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची कविता (संपादन : प्रज्ञा दया पवार यांच्यासह), आयदान : सांस्कृतिक ठेवा - संपादन - सिसिलिया कार्व्हालोंसह) , निवडक अबकडई (संपादन अरुण शेवतेंसह) इत्यादी त्यांची संपादने प्रसिद्ध आहेत. सदरलेखनही त्यांनी आत्मीयतेने केले. लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, कैफी आझमी पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, महाराश्ट्र फाऊंडेशन पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

---------------------------------------------------------------------------------------

सतीश काळसेकर यांच्या निधनाची बातमी वाचली.धक्का बसला. साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे कवी आणि लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे एक प्रणेते म्हणून काळसेकर ओळखले जात. मराठवाडा साहित्य परिषदेने आपला कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार देऊन त्यांच्या कवितेचा गौरव केला होता. साहित्य अकादमीने त्यांच्या 'वाचनारांची रोजनिशी' या लेखसंग्रहाला २०१३चा पुरस्कार देऊन त्यांच्या लेखनाचा सन्मान केला होता. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते हितचिंतक होते. त्यांच्या निधनामुळे परिषदेने आपला एक मित्र गमावला आहे.

मी मराठवाडा साहित्य परि षदेच्या व अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक प्रकट करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो अशी त्या निर्मिकाकडे प्रार्थना करतो.
- कौतिकराव ठाले पाटील
अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद आणि
अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी
साहित्य महामंडळ,औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...