आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर धाड टाकून 11 सदनिका जप्त केल्या. ईडीने या कारवाईद्वारे केवळ पाटणकरच नव्हे तर त्यांच्या माध्यमातून थेट महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणाऱ्या ठाकरे कुटूंबियांना आव्हान दिले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत श्रीधर पाटणकर व त्यांचा ठाकरे कुटूंबियांशी काय संबंध आहे...
श्रीधर पाटणकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते डोंबिवलीत राहतात. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचा रासायनिक उत्पादनांशी संबंधित एक छोटासा व्यवसाय होता. पण, श्रीधर यांनी याहून वेगळा मार्ग निवडत रियल ईस्टेट क्षेत्रात नशीब आजमावण्याचे ठरवले. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले. आज मुंबई व उपनगराच्या रियल ईस्टेट क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
ईडीने काय केली कारवाई
ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या आहेत. बाजारपेठेत या सदनिकांची किंमत साडेसहा कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे. हे फ्लॅट्स श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा.लि. कंपनीचे आहेत. श्रीधर या कंपनीचे संचालक आहेत. ईडीने पुष्पक बुलियन फसवणुकीप्रकरणी ही कारवाई केली आहे.
ईडीने 6 मार्च 2017 रोजी या प्रकरणी पुष्पक बुलियन व ग्रुप ऑफ कंपनीज विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
ठाकरे कुटूंबापर्यंत पोहोचले ईडीचे अधिकारी
या कारवाईमुळे ईडीचे अधिकारी थेट ठाकरे कुटूंबापर्यंत पोहोचले आहेत. उद्धव यांचे सासरे म्हणजे रश्मी यांचे वडील माधव पाटणकर यांचे जून 2020 मध्ये निधन झाले. त्यांना 3 मुले आहेत. रश्मी त्यांच्या द्वितीय कन्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती यांच्या माध्यमातून त्या उद्धव यांच्या संपर्कात आल्या. या दोघांचा 1989 मध्ये विवाह झाला.
कसा फिरला पैसा?
पुष्पक बुलियन कंपनीने 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालामार्फत वळती केली होती. या व्यक्तीने नंतर दोन-तीन शेल कंपन्या स्थापन करुन ते पैसे अन्य कंपन्यांकडे वळते केले. त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकरांपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.