आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय वडेट्टीवार यांचे अाश्वासन:संकटाचा सामना करणाऱ्या लोकांचे स्थलांतर करणार

मानगाव (रायगड)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वादळाच्या तडाख्यात नुकसान झाल्यानंतर गुजरातमध्ये पाहणीसाठी गेले आणि तिथे १००० कोटींची मदत दिली. महाराष्ट्राकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. समुद्रकिनारी कायम संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना कायमचे स्थलांतरित करण्याचे धोरण आणत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

साेमवारी झालेल्या तौक्ते चक्री वादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माणगाव येथे पत्रकारांशी बोलत हाेते. वडेट्टीवार म्हणाले, नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवला आहे. यासंदर्भात काही मंत्र्यांनी सूचना सुचवलेल्या आहेत. दुरुस्तीनंतर लवकरच हे धोरण अमलात आणले जाईल. कोकणी जनतेला महाआघाडी सरकारने कधीही वाऱ्यावर सोडले नाही आणि सोडणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुसती टीका करीत असतात. आम्ही गेल्या वेळी वादळात संकटात ७७३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. एखादा दुसरा कोणी राहिला असेल तर त्यालाही देण्याचा प्रयत्न करू. काही निकषही बदलले. रक्कम वाढवून दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकार कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यांनी दिलेले व्हेंटिलेटर बंद पडले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनची सर्व यंत्रणा त्यांनी ताब्यात ठेवली. राज्यात संसर्ग असतानाही महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. तरीही राज्याने या संकटाचा यशस्वी मुकाबला करून यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा करून तेथे एक हजार कोटी रुपयांची घोषणा केली. महाराष्ट्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लसीकरणाबाबत हे सरकार दुजाभाव करत आहे. आता आम्ही ग्लोबल टेंडर काढून लस मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अाराेप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

केंद्र सरकार नेहमीच दुय्यम वागणूक महाराष्ट्राला देतेय. मदतीसाठी त्यांना आम्ही पत्र पाठवले आहे. एखादे पथक पाठवा, पण महाराष्ट्राला मदत करा असे आम्ही त्यांना कळवले आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

तिसरी लाट थोपवण्याची तयारी करतोय - तटकरे

गेल्या आठवड्यापासून रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. आज सातशे ते आठशे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख लोकांना लस दिली गेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ६५० ऑक्सिजन निर्मिती होते. त्यातील तीस-पस्तीस टन जिल्ह्यासाठी वापरून जवळपास सहाशे टन ऑक्सिजन ठाणे जिल्ह्याला पुरवला जातो. जिल्ह्यामध्ये पंधरा-वीस दिवसांपूर्वी साथरोग पसरली होती. त्या वेळी घरोघरी जाऊन सर्व्हे केला. त्यामुळे आता तिसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. महाडमध्ये दहा व्हेंटिलेटर सुरू केले आहेत, अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माणगाव येथे दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. चक्रीवादळाचा मोठा तडाखा कोकणाला बसला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोकण दौऱ्यावर येत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...