आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनांचा सवाल:शिक्षकदिनी शिक्षकांचे पूजन करा : आ. बंब यांचे आवाहन

गंगापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी (५ सप्टेंबर) मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षकांचे पूजन करण्याचे आवाहन गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी केले असून शिक्षकांचे पूजन करण्याचे आताच का आठवले? हा शिक्षकांचा उपहास करण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया गंगापूर तालुक्यातील शिक्षकांच्या संघटनांनी दिल्या आहेत.यासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांनी शनिवारी निवेदन प्रसिध्दीसाठी दिले असून त्यात राज्यातील ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य, शालेय समिती सदस्य यांनी त्यांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांबद्दल कृतज्ञता म्हणून शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) गावात मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचे पूजन करण्याचे आवाहन केले आहे. जे राहत नाही त्यांची माहिती ई-मेलद्वारे आ. बंब यांना पाठवण्याचे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात गंगापूर तालुक्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता मुख्यालयी राहण्यासाठी घरांची अनुपलब्धता, शिक्षणबाह्य कामांचा व्याप, शाळांमध्ये असलेल्या भौतिक सुविधांचा अभाव आदींमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली, तर काहींनी नावासह प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली.

आमदार प्रशांत बंब यांची कल्पना स्वागतार्ह
शिक्षकांचे पूजन ही आमदार प्रशांत बंब यांची कल्पना स्वागतार्ह आहे, मात्र पूजन आताच का आठवले? ही कल्पना यापूर्वी का अमलात आणली नाही? शिक्षक यापूर्वी चांगले काम करीत नव्हते का? एकीकडे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करायचे व दुसरीकडे गोंजारायचे हा दुटप्पीपणा नको.
- राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ

शिक्षकांविषयी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न
शिक्षकांविषयी वातावरण दूषित करण्याचा सुरू असलेला प्रयत्न चुकीचा आहे. तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या कर्तव्याप्रति सर्वांच्या मनात सदैव सन्मानाची भावना असते आणि शिक्षक दिन हा सन्मानाचा दिवस असल्याने कुणीही संवेदनशील व्यक्ती शिक्षकांचा उपहास करणार नाही याची खात्री आहे.
- भगवान हिवाळे, शिक्षक सेना

मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरू नये
आ. प्रशांत बंब यांचा पूजनाचा उपक्रम स्तुत्य असला तरी वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरू नये. शाळा, विद्यार्थी व गावाच्या विकासासाठी शिक्षकांचा त्यांना कायम पाठिंबा राहील.
- सुनील जाधव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...