आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत येथील तरुणीसोबत व्हॉट्सअॅपवरुन मैत्री करून त्यानंतर फोटो मागवून व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या महेबुबनगर (तेलंगणा) येथील एका तरुणावर वसमत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यास पोलिसांच्या पथकाने बुधवारी (ता. 2) ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील महेबुबनगर येथील मोहमद अफरोजखान जिलानी खान याने व्हाटस्अपच्या माध्यमातून वसमत येथील एका तरुणीसोबत मैत्री केली. त्यांचे व्हाटस्अपच्या माध्यमातून नेहमीच संभाषण होऊ लागले होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीची रुपांतर प्रेमात झाले. यावेळी मोहमद अफरोजखान याने त्या तरुणीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिला फोटो पाठविण्यास सांगितले. लग्न होणार असल्याने त्या तरुणीने फोटो देखील पाठविले. मात्र त्यापुढेही जाऊन त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून तरुणीचे स्क्रीन रेकॉर्डींग केले.
दरम्यान, सदर छायाचित्र व रेकॉर्डींग तरुणीच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार कुटुंबाला सांगितले. त्यानंतर तरुणीसह कुटुंबियांनी वसमत शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी मोहमद अफरोज याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक प्रतिभा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भागीरथ सवंडकर, मिटकर, गोरलावाड यांच्या पथकाने रातोरात तेलंगणा राज्यात जाऊन त्यास ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक शेटे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.