आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची माहिती:झंवरने ‘बीएचआर’च्या 21 कोटींच्या मालमत्ता खरेदी केल्या 6 कोटींमध्ये; तपासामध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा अडथळा

पुणे, जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठे कर्जदार झंवरच्या संपर्कात

बीएचआर मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला मंगळवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, झंवर याने २१ कोटींच्या मालमत्ता केवळ ६ कोटीत खरेदी केल्याचे उघड झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या या गुन्ह्यातील तपासाबाबत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव व पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून बरीच माहिती विचारली आहे. गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला? व्याप्ती किती? आणखी कोणाचा समावेश आहे? झंवर, कंडारे यांच्या घराबाहेर पोलिस गार्ड कोणी लावले? जळगावात छापेमारी करण्यासाठी आलेले पोलिसांचे पथक कोणत्या हॉटेलात थांबले? अशा प्रकारची माहिती चव्हाण यांनी वेळोवळी विचारली आहे. यातील गोपनीय माहिती वगळता इतर माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे.

चव्हाण यांनी केलेल्या या प्रकारामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत. चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची नोंद झंवरकडे आलेल्या हार्डडिस्कमध्ये आहे. त्या अनुषंगाने चव्हाण यांचा पत्रव्यवहार करण्याचा तसेच आर्थिक व्यवहाराचा काय उद्देश आहे याचा तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस, सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे. याशिवाय बीएचआरने पुण्यात २१ कोटी ३० लाख रुपयांत तीन मालमत्ता खरेदी केल्या होत्या. या मालमत्ता झंवर याने स्वत:च्या फायद्यासाठी आपल्या संबंधित लोकांच्या नावावर करताना बीएचआरला ५ कोटी ७२ लाख ४४ हजार २२१ रुपये दिले. यातही त्याने ४ कोटी २ लाख ३८ हजार ९१ रुपयांच्या ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग केल्या.

म्हणजेच त्याने प्रत्यक्षात १ कोटी ७० लाख ६ हजार १३० रुपये खर्च केले. यासह अनेक माेठ्या व्यवहारांमध्ये झंवरने थेट हस्तक्षेप करून घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. मालमत्ता खरेदी कण्यासाठी त्याने इतर संशयितांशी संगनमत करून ई टेंडरिंगमध्ये स्वत:च्या संस्था, शालेय पोषण आहाराच्या कामासाठी वाहन पुरवणारे ठेकेदार, पोषण आहार पुरवणारे सब ठेकेदार यांंच्या नावाने निविदा भरल्या. कृणाल शहाच्या मदतीने बीएचआरचे सॉफ्टवेअर स्वत:च्या कार्यालयात इन्स्टॉल केल्याने मालमत्ता लिलाव ई प्रक्रिया टेंडरपूर्वीच मिळत होती. त्यानुसार सुनील झंवर व त्याचा मुलगा सूरज झंवर हे कार्यालयात बसून मनाप्रमाणे लिलाव करत होते. याबाबत हार्डडिस्क पोलिसांनी जप्त केली आहे.

मोठे कर्जदार झंवरच्या संपर्कात
सुरुवातीला ठेवीदारांना पावत्यांचे २० ते ३५ टक्के रक्कम देण्याचे आमिष दाखवले. यानंतर कर्जदारांना हाताशी धरून परस्पर पावत्या मॅचिंग करून घेतल्या. त्याच्या खोट्या नोंदी करून घेतल्या. गेल्या महिन्यात पोलिसांनी राज्यातील ११ बड्या कर्जदारांना अटक केली होती. हे सर्व कर्जदार घोटाळ्यापूर्वी व नंतर झंवरच्या संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

राजकीय व्यक्तींशी आहेत लागेबांधे
झंवर याचे राजकीय व्यक्तींशी लागेबांधे असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती, बदलीत झंवरची भूमिका राहायची. आठ महिन्यांपासून झंवर बेपत्ता होता. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तो लपून बसला. त्यामुळे त्याने गुन्ह्याची संबंधित कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे या ठिकाणांवर लपवून ठेवली असल्याचा संशय आहे. तो कोणाच्या संपर्कात होता याची माहिती घ्यायची आहे. झंवरच्या घरी व कार्यालयात मिळालेली कागदपत्रे, हार्डडिस्कबाबत सखोल चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगून १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याला ९ दिवासंची कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...