आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निवडणूक:नागपुरात काँग्रेस, अकोल्यात वंचितची सत्ता, विदर्भात भाजपला झटका; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भाजपला मिळाली 2 वर्षे मुदतवाढ

नागपूर/अकोला/वाशीम19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नंदुरबारात ८ ओबीसी उमेदवार विजयी

नागपूर, अकोला, वाशीम जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. अनेक वर्षे वर्चस्व राहिलेल्या नागपूर जि. प.त काँग्रेसने सत्ता कायम ठेवली. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने तर वाशीममध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले.

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १० पैकी ९, राष्ट्रवादीचे ५ पैकी २ तर शेकापचा १ उमेदवार निवडून आला. भाजपचे १० पैकी फक्त ३ उमेदवार निवडून आले. पारडसिंगा येथून मीनाक्षी संदीप सरोदे व सावरगाव सर्कलमधून पार्वती काळबांडे हे दोन भाजप सदस्य विजयी झाले. २०१२ ते २०१७ अशी पाच वर्षे भाजपची सत्ता होती. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पहिले उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे भाजपला २ वर्षे मुदतवाढ मिळाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकत सत्ता मिळवली.

हा एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी दिली. ओबीसी समाजावर भाजपने केलेल्या अन्यायाचे उत्तर मतदारांनी दिले. भाजपच्या चुकीमुळे निवडणूक ओबीसींशिवाय घ्यावी लागल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. काँग्रेसने सत्तेचा आणि पैशाचा अमर्याद वापर केला. १७ जागांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने पन्नासहून अधिक आमदार प्रचाराला जुंपले. त्यामुळेच भाजप पराभूत झाला, असे भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

अकाेल्यात वंचितची सरशी; सत्ता टिकवण्याचा मार्ग खडतर
प्रतिनिधी | अकाेला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ४२ जागांच्या पाेटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जि.प. १४ पैकी ६ जागांवर सत्ताधारी वंचित बहुजन अाघाडीने बाजी मारली. तूर्तास तरी सत्ता राखण्यात वंचित यश आल्याचे दिसून येत आहे. मात्र ५३ सदस्य संख्या असलेल्या जि.प.मध्ये आता वंचितची संख्या २३ झाल्याने सत्ता टिकवण्याचा प्रवास मात्र खडतर राहणार आहे. निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, भाजप व प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येकी एका जागेवर विजयी झाला, तर दाेन ठिकाणी अपक्षांनी विजयश्री खेचून आणली. हे दाेन्ही अपक्ष वंचितचे बंडखाेर उमेदवार आहेत. या निवडणुकीत वंचितला व भाजपला प्रत्येकी दाेन जागांचे नुकसान झाले असून, राष्ट्रवादीला मात्र एका जागेचा फायदा झाला. शिवसेना, काँग्रेसला सदस्य संख्या पूर्वीचीच कायम राखण्यात यश आले. पं.स.च्या २८ पैकी १६ जागांवर वंचित १६, शिवसेना-५, भाजप-३ आणि काँग्रेस, एमआयएम व प्रहार व अपक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली.

गत दाेनपेक्षा जास्त दशकांपासून जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये वंचितला राेखण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कधी आघाडी करून तर कधी स्वबळावर लढली. मात्र सामाजिक समीकरणाच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्यात वंचितला यश आल्याचे पाेटनिवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. ही निवडणूक सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस व प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढले हाेते.

वाशीममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस
वाशीम जिल्हा परिषदेच्या एकूण १४ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ५ जागांवर विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाने २ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता येथेही राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे.

नंदुरबारात ८ ओबीसी उमेदवार विजयी
जिल्हा परिषदेच्या पाेटनिवडणुकीत भाजपसह महाविकास आघाडीने ओबीसी उमेदवारांनाच या निवडणुकीत संधी दिली. त्यामुळे १५ पैकी १४ गटातून ओबीसी उमेदवार निवडून अाले. यातले सहा सदस्य पुन्हा विजयी झाले तर तर ९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. धुळे पंचायत समिती वगळता साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा ‘जैसे थे’ स्थिती राहिली. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ जागांवर ८ ओबीसीचे उमेदवार निवडून आले. कोळदे, पाडळदा व खापर गटात अनुसुचित जमातीचे उमेदवार निवडून आले.

बातम्या आणखी आहेत...