आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न:परभणीत आंबेडकरवादी संघटना आक्रमक, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आज परभणीत आंबेडकरवादी संघटनांनी केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांची काही वेळ झटापटही झाली.

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याचे पडसाद आज परभणीत उमटले.

आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले

चंद्रशेखर बावनकुळे आज परभणी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केले. परभणीत बावनकुळे यांचा ताफा एकेठिकाणी जात असतानाच आंबेडकरवादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले व तो ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांनी आंदोलकांना मार्गावरून हटवले. यावेळी आंदोलक व पोलिसांची झटापटही झाली. यावेळी आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडेही दाखवले.

बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, आज परभणीत पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जी 20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून त्यामुळे संपूर्ण जगाला देशाची उज्ज्वल परंपरा, संस्कृती व ताकद कळणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, केवळ राजकीय द्वेषापोटी उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर आरोप केला की, अडीच वर्षांच्या काळात केंद्र शासनाच्या योजनांच्या पाठपुरावा करू नये, असा प्रशासनाला अलिखित आदेश होता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ झाला नाही.

महाराष्ट्राची 1 इंच जमीन देणार नाही

सीमावादाच्या मुद्द्यावर चंद्रशेखर बावकुळे म्हणाले की, सीमावादप्रश्नी दोन्ही बाजूने चिथावणीखोर वक्तव्य टाळून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्याच्या सरकारने परस्पर समन्वय साधून हा प्रश्न जलदगतीने न्यायालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्राची इंचभरसुध्दा जमीन कुठेही जाणार नाही.

लोकसभेत 45हून अधिक जागा जिंकणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित प्रयत्न करणार असून राज्यात आमचे लोकसभेच्या ४५ + जागा जिंकण्याचे ध्येय आहे. यासाठी बूथस्तरावर नियोजन केले जात आहे. तसेच, परभणीचा विकास व्हावा यासाठी अडकलेल्या प्रस्तावांची माहिती घेतली जात असून यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...