आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नदान यज्ञ:दररोज 50 गरजवंतांना दोन वेळा घरपोच डबा, मानवतच्या गजानन महाराज मंदिराचा सेवायज्ञ

प्रसाद जाेशी | परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला. या वैश्विक संकटात खऱ्या अर्थाने माणुसकीचीच परीक्षा होती. या काळात अपापल्या कार्याचा ठसा उमटवलेली एक संस्था म्हणजे मानवतचे संत गजानन महाराज मंदिर. या संस्थेने काेराेनाकाळात हजाराे लाेकांसाठी अन्नदान उपक्रम राबवला. संस्था मागील अडीच वर्षांपासून ५० गरजवंतांची भूक भागवत असून त्यांना दाेन वेळ घरपाेच जेवणाचा डबा पुरवत आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त हाल झाले ते हातावर पाेट असणारांचे. त्यात वयोवृद्ध, निराधार, अपंगांचे तर जीवनचक्रच थांबले हाेते. संकटाच्या या काळात या गरजवंतांना आधार दिला मानवतच्या संत गजानन महाराज मंदिराने. संस्थानने रोज सकाळी व सायंकाळी दोन वेळा घरपोच जेवणाचा डबा दिला. एका अर्थाने ही त्यांच्यासाठी जीवनदायी योजनाच होती. मंदिर समितीने हा संपूर्ण खर्च देणगीतून मिळणाऱ्या रकमेतूनच करायचे ठरवले होते. याप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ५० व्यक्तींना घरपोच दररोज दोन वेळा जेवणाचा डबा देण्यात आला.

लॉकडाऊन संपला व सर्व व्यवहार सुरळीत झाले. मात्र वृद्धापकाळाने दृष्टी अंधुक झालेले, सुरकुत्या पडलेले हात ठरलेल्या वेळेला जेवणाचा डबा घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी हा सेवायज्ञ जगण्याची ऊर्जा बनला होता आणि म्हणून कदाचित ते लाभार्थी हा सेवायज्ञ बंद पडू नये म्हणून ईश्वराकडे प्रार्थना करत असावेत. ईश्वरानेही त्यांचे गाऱ्हाणे ऐकले व लॉकडाऊन संपल्यानंतरही मंदिर समितीने हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या स्वयंपाकघरात जेवण तयार केले जाते. ज्येष्ठ कार्यकर्ते डबा घरपोच देतात. यासाठी दरमहा ६० हजार रु. खर्च येतो. हा सर्व खर्च मंदिर समिती करते. १ सप्टेंबर २०१० राेजी संत गजानन महाराज मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून आजपर्यंत दर गुरुवारी १ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

लॉकडाऊनमधील अन्नदान यज्ञ - ४३ दिवसांत तब्बल ७५ हजार जेवणाचे डबे. - १५० घरांना एक महिना पुरेल असे रेशन. - उपक्रमाची आजपर्यंत कुठेही प्रसिद्धी नाही.

बातम्या आणखी आहेत...