आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:परभणीत सर्वच पक्षांत अंतर्गत कुरघोडी, गटा-तटाचे ग्रहण

प्रसाद जोशी | परभणी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगळ्या गटामुळे राज्यात सर्वत्र पडझड झाली असताना सेनेचे खासदार संजय जाधव व परभणी विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. राहुल पाटील हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावान राहिले. असे असले तरी मागील काही दिवसांत विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया यांनी व सेनेचे दीर्घकाळ जिल्हाप्रमुख राहिलेले भास्कर लंगोटे व त्यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. त्यामुळे सेनेत असलेले शिवसैनिक द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरवर सर्व ठीक दिसत असले तरी सर्व काही सुरळीत आहे असे म्हणता येत नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी काही महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने त्यांनी नाराजी अस्त्र म्यान केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणी दौऱ्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे पक्षातील वाढते वजन दिसून आले. पक्षाचे पुढील जिल्हाध्यक्ष तेच असल्याची कार्यकर्त्यांमध्ये अजूनही चर्चा होत आहे आणि यामुळेच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांमधील सख्य बिघडले असल्याचे बोलले जात आहे.

कॊँग्रेस अजूनही सत्ताधारी मानसिकतेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश वरपुडकर यांचा विधानसभेतील विजय व परभणी वगळता कॉँग्रेसला कोठेही फार मोठे यश मिळाले नाही. मात्र अजूनही काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते सत्ताधारी पक्षाच्या मानसिकतेत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. आमदार सुरेश वरपुडकर यांच्या स्नुषा व युवक कॊँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणा वरपुडकर यांचा मतदारांशी असलेला संपर्क वगळता पक्षाच्या अन्य नेत्यांचे पक्ष संघटन, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि त्यासाठी दौरे असे कुठलेही कार्य सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत यश मिळवण्याचे मोठे आव्हान आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासमोर असणार आहे.

विविध पक्षांतील बंधुभावाचा परभणी पॅटर्न साधारणपणे राजकीय पक्षाच्या नेत्यांचे कुटुंबीय त्या पक्षाचाच प्रचार, प्रसार करतात. मात्र विविध पक्षातील बंधुभावाचा अनोखा परभणी पॅटर्न जोपसला जात आहे. खासदार संजय जाधव यांचे बंधू आणि हरिओम मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारे बाळासाहेब जाधव हे भाजपमध्ये आहेत तर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांचे बंधू विजय वरपुडकर यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व युवा नेतृत्व समीर दूधगावकर यांचे वडील माजी खासदार गणेशराव दुधगावकर अजूनही राष्ट्रवादीतच आहेत.

भाजपमध्येही सुंदोपसुंदी पार्टी विथ डि्फरन्स अशी ओळख असलेल्या पक्षात पक्षशिस्तीला महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मात्र जिल्ह्यातील भाजप नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत. परभणीत नुकत्याच झालेल्या बैठकीप्रसंगी शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त माध्यमात होते.

कार्यकर्त्यांचीही चलबिचल महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील अनेकांनी पक्षबदल केले. भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीसोबत संधान साधले होते. परंतु राज्यातील नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांतील चलबिचलही वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...