आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी पोलिसांनी मुलांचे अपहरण करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे. लहान मुलांना फूस लावत कारमध्ये बसवायचे आणि हैदराबाद येथे निपुत्रिक असणाऱ्या जोडप्यांना या मुलांची अवघ्या दीड लाखात विक्री केली जात होती. परभणी पोलिसांनी अपहरण केलेल्या दोन मुलांचा शोध लावत या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले आहे.
राज्यभरात रॅकेट
मुलांचे अपहरण करणारे हे रॅकेट राज्यात पसरले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोतवाली पोलिस ठाण्याअंतर्गत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याचा घटना घडल्या होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी तस्करी विभागाचे अधिकारी व अंमलदार पोलिस उपनिरीक्षक आर. जी. भावसार, पोलिस अंमलदार शेख शकील अहमद, किरडे, शिरसकर, शेळके यांनी गुन्ह्याचा कसोशीने शोध घेतला. दोन्ही बालकांचे अपहरण हे परभणीतील अजमेरी काॅलनीतील रहिवासी सुलताना ऊर्फ परवीनबी शेख सादेक अन्सारी या महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला परभणीतील सुभेदारनगर येथील तिची बहीण नूरजहाँ बेगम महंमद इब्राहिम शाकेर व तिचे विधिसंघर्षग्रस्त बालक मदत करत होते. पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन चाैकशी केली तेव्हा हा प्रकार समोर आला.
एका बालकामागे दीड लाख रुपये
हैदाबाद येथील गीता व तिचा पती समीर ऊर्फ मुन्ना यांच्या सांगण्यावरून मुलांचे अपहरण केले जात होते व एका बालकामागे एक ते दीड लाख रुपये दिले जात असल्याचे आरोपी महिलांनी चाैकशीत कबूल केले. पोलिसांनी अपहरण केलेल्या दोन्ही मुलांचा शोध लावला असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. एका प्रकरणात सुलतानाची बहीण नूरजहाँ व तिच्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने पैशांचे आमिष दाखवून राहत कॉलनी खानसाब यांचा मळा एकमिनार मशीद, दर्गा रोड, परभणी येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचे पोलिसांना सांगितले.
असे आहेत आरोपी
अपहरण प्रकरणाच्या या गुन्ह्यात १० आरोपींना ताब्यात घेतले. १ विधिसंघर्षग्रस्त बालक व एका महिलेस नोटीस देऊन सोडले. या प्रकरणात नूरजहाँ बेगम महंमद इब्राहिम शाकेर, परवीनबी सादेक अन्सारी, शेख समीर शेख सरवर, पडेला श्रावणी, एम. रणजित प्रसाद, संगीता पांचोली, नामिला सूर्या मांगया, शेख चाँद पाशा शेख सैलानी, राजेंद्र नरेश रासकटला, सय्यद मजहर अली सय्यद मोहंमद अली, इरगा दिंडला शिल्पा यांना ताब्यात घेतले.
बनावट आधार कार्ड बनवून एजंटांमार्फत बालकांची विक्री
परभणीतील आठ दिवसांच्या मुलीलाही विकले पोलिसांनी छडा लावलेल्या प्रकरणात दोन्ही अपहृत बालकांचे बनावट आधार कार्ड व बाँड तयार केले होते. हैदराबाद येथील विविध एजंटांमार्फत निपुत्रिकांना या बालकांची विक्री व्हायची. शेख समीर शेख सरवर (भुन्या, रा. परभणी) याने परभणी येथील हडको येथील महिलाच्या आठ दिवसांच्या मुलीला पळवून नेत हैदराबाद येथे संगीता ऊर्फ गीता आनंद पांचोलीकडे विकले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.