आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सुराज्य:महिला अधिकाऱ्यांकडून पाच बचत गटांना 28 लाखांचे कर्ज, जिल्ह्यात 10 हजारांवर निर्धूर चुली वाटपास मंजुरी

परभणी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यात सध्या महिला राज आहे. न्यायाधीश, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षकपदी महिलाच कारभार पाहत आहेत. गुरुवारी (१० नाेव्हेंबर) सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महा शिबिर घेण्यात आले. यात विशेषत: पाच महिला बचत गटांना २८ लाखांचे कर्ज मंजूर करण्यासह १० हजार २०० महिलांना निर्धूर चुली वाटपास मंजुरी मिळाली. इतर १७१ जणांना प्रत्यक्ष शासकीय योजनांचा फायदा मिळवून दिला गेला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणीतील श्री मंगल कार्यालयात शासकीय योजनांचे महा शिबिर घेण्यात आले. याचे उदघाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एम.नंदेश्वर होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांची उपस्थिती होती. कायदेविषयक जनजागृती तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची जनतेस माहिती व्हावी यासाठी शासकीय कार्यालयांनी स्टॉल लावून त्या योजनांबाबत माहिती दिली. या शिबिरात महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले. शिबिरात एकूण ११७ जणाना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. ॲड. जीवन पेडगावकर यांनी सूत्रसंचालन तर एस.जी.लांडगे यांनी आभार मानले.

पाच जणींना दिल्या चुली बचत गटांना आयसीआयसीआय बँकेमार्फत २८ लाख रुपयांचे धनादेश वितरीत केले गेले. विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात दहा हजार दोनशे निर्धूर चुली मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. यापैकी पाच महिलांना निर्धूर चूल वाटप करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...