आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपघातातील जखमीला उपचारासाठी घटनास्थळावरून रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेले जात होते. मात्र, रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेचा दरवाजा न उघडल्याने रुग्णास वेळेवर उपचार मिळाले नाही व यातच रुग्णाचा मृत्यू झाला. ही गंभीर घटना परभणी जिल्ह्यातील मानवत येथे घडली.
अपघातानंतर रक्तस्त्राव
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मूळ बंगाल मधील रहिवासी असलेले शेख शफिकूल इस्लाम हे पाथरी येथे दागदागिने घडविण्याचे काम करत होते. दि. 23 नोव्हेबर रोजी त्यांचा अपघात झाला. डोक्यास मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. त्यास उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका आली. रुग्णास प्राथमिक उपचारासाठी मानवत येथील रुग्णालयात आणण्यात आले.
नेमका काय घडला प्रकार?
रुग्णास रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेचे दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार काही उघडले नाही. पंधरा मिनिट गेल्यानंतर दार उघडले गेले. रुग्णाची गंभीर प्रकृती पाहून त्यास परभणी येथे उपचारार्थ पाठवण्यात आले. परभणीत पोहोचल्यानंतरही तीच परिस्थिती अनुभवास आली. रुग्णवाहिकेचे दार उघडलेच नाही. त्यानंतर रुग्णास दाखल केले गेले.
व्हिडीओमुळे प्रकार उघड
प्रकृती गंभीर पाहता त्यास उपचारार्थ खासगी वाहनाने नांदेड येथे पाठवण्यात आले परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी या रुग्णास प्राण गमवावे लागले. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अशी घटना घडल्याचे उघडकीस आले हे विशेष!
नादुरुस्त ॲम्बुलन्स चा प्रश्न
जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. मात्र त्यासाठी चालक बाह्यस्रोतामार्फत नेमण्यात आले. त्यांच्या कामाचा कालावधी संपला असल्याने ते कामावर रुजू नाहीत. त्यांच्या वेतनचाही प्रश्न कायम आहे. अनेक ठिकाणी ॲम्बुलन्स नादुरुस्त आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.