आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील बहुतांश भागात मागील चार ते पाच दिवसांतील किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी गारवा वाढला होता. आता ढगाळ वातावरण निर्माण होऊन किमान तापमानात वाढ होत आहे. १ डिसेंबरला परभणीचे तापमान ९.५ अंश सेल्सियस असताना ४ रोजी पारा १९.० अंशांवर गेला. एकाच दिवसात पुन्हा ४ अंशांनी यात घट झाली. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तापमानात चढ-उतार होत असल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदवले.
काही दिवसांच्या फरकाने तापमानात मोठा बदल होत असल्यामुळे त्याचा पिकांवर गंभीर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना वातावरणाच्या लहरीपणाचा अनेकदा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि नंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यानंतर झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले. सद्य:स्थितीत अशा प्रकारच्या वातावरणातील बदलाने तूर, गहू व हरभरा पिकांना धोका निर्माण झाला आहे. १ डिसेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान दहा अंश सेल्सियसने किमान तापमानात वाढ झाली. १ रोजी ९.५ किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला होता. मात्र अचानक किमान तापमानात वाढ़ होऊन ४ रोजी १९.० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. केवळ पाच दिवसांतच किमान तापमान तब्बल १० डिग्रीने वाढल्याने थंडी बऱ्याच अंशी कमी झाली. तुरीच्या पिकाला शेंगा भरण्याचा कालावधी असताना ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तसेच फुलगळ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची दाट शक्यता आहे.
बदलाचा पिकांना धोका ^तापमानातील या बदलाने पिकांना धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरण पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक आहे. सर्वात जास्त फटका तुरीला बसू शकतो. फुलगळ होण्याचा धोका संभवतो. बदलत्या वातावरणामुळे गहू व हरभरा पिकांची वाढ खुंटू शकते. - डॉ. गजानन गडदे, अधिष्ठाता, विस्तार शिक्षण संचालनालय, व.ना.म. कृषी विद्यापीठ, परभणी.
तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार ^दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि ९ डिसेंबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. परिणामी १० ते १२ हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. - डॉ. ए. एस. होसळीकर, हवामान विभागप्रमुख, पुणे.
तापमानातील बदल तारीख किमान १ डिसेंबर ९.५ २ डिसेंबर ११.२ ३ डिसेंबर १४.७ ४ डिसेंबर १९.० ५ डिसेंबर १६.०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.