आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पिकांच्या वाणास मान्यता:तूर-साेयाबीनच्या वाणास राष्ट्रीय, राज्यात मान्यता

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास राज्यात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीची बैठक काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे डॉ. टी.आर.शर्मा (उपमहासंचालक पीकशास्त्र) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या बैठकीत विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास मान्यता देण्यात आली.

यात विद्यापीठ विकसित तुरीचे वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका) राष्ट्रीय पातळीवर मध्य भारतासाठी, तर सोयाबीनचे एमएयूएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणास राज्यात लागवडीसाठी मान्यता प्राप्त झाली. या वाण मान्यतेबाबतचे पत्र नुकतेच देशाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून विद्यापीठास प्राप्त झाले. या वाणांचे बियाणे हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये या वाणांचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. वाण विकसित करण्याकरिता योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी अभिनंदन केले. तुरीच्या वाणाला महाराष्ट्रासह चार राज्यांत मान्यता तुरीचे बीडीएन-२०१३-२ (रेणुका) वाण : तुरीचे रेणुका वाण विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केले आहे. या वाणाला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या मध्य भारत प्रभागात प्रसारित करण्यासाठी मान्यता मिळाली. बीएसएमआर-७३६ मादी वाण वापरून आयसीपी-११४८८ हा आफ्रिकन दाते वाण संकरित करत निवड पद्धतीने तयार करण्यात आले आहे. ते १६५ ते १७० दिवसांत तयार होते व मर रोगास प्रतिकारक तर वांझ रोगास प्रतिबंधक आहे. या वाणाचे १०० दाण्यांचे वजन ११.७० ग्रॅम आहे. फुलांचा रंग पिवळा तर शेंगांचा रंग हिरवा आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन हेक्टरी १८ ते २० क्विंटल आहे. करडई पिकांचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हे वाण अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित केले.

सोयाबीनचे वाण ९० ते ९५ दिवसांत येते सोयाबीनचा एमएयूएस-७२५ हे वाण अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित केले आहे. हे वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित केला आहे. हा वाण ९० ते ९५ दिवसांत लवकर येते. गडद हिरवी पाने आणि शेंगाची जास्त संख्या व २०-२५ टक्के चार दाण्यांच्या शेंगा असलेला हे वाण आहे. बियाण्याचा आकार मध्यम असून १०० दाण्यांचे वजन १० ते १३ ग्रॅम आहे. हे वाण कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हेक्टरी उत्पादन क्षमता सरासरी २५ ते ३१.५० क्विंटल आहे.

बातम्या आणखी आहेत...