आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:वैद्यकीय महाविद्यालयाकरिता परभणीकरांचे पुन्हा जनआंदोलन, 8 मेपासून धरणे आंदोलन अन् निदर्शने करणार

प्रतिनिधी | परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय महाविद्यालयाच्या स्थापनेत दोन सदस्यीय केंद्रीय समितीने किरकोळ गोष्टींवर आक्षेप नोंदवून निर्माण केलेल्या अडथळ्यांच्या विरोधात ‘आम्ही परभणीकर’ या व्यासपीठाच्या माध्यमातून ८ मेपासून पुन्हा जनआंदोलन उभे करणार आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेत उद्भवलेल्या अडथळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विचार-विनिमय करण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात २ मे रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दोन सदस्यीय समितीने घेतलेल्या आक्षेपांसह केलेल्या कृतीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विशेषतः वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसंदर्भात जमीनीचे हस्तांतरण, निधीस मंजूरी, पदभरतीस मंजुरी तसेच अन्य गोष्टीतील प्रशासकीय मान्यता बहाल झाल्या असतानाही या समितीने प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावरच केलेल्या कृतीवर राज्य सरकारद्वारे सोमवारी अपील दाखल करण्यात आले आहे, असे खासदार जाधव यांनी नमूद केले. या अपिला संदर्भात लवकरच निर्णय होईल नव्याने समिती गठीत होऊन दौरा करेल, असा विश्‍वास व्यक्त केला. परंतु, यासाठी आम्ही परभणीकर या व्यासपीठाच्या माध्यमातून जनआंदोलनाचा रेटा उभारणे गरजेचे आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी आपल्या विरोधात विनाकारण गैरसमज पसरवले जात आहेत, अशी खंत यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

त्रुटी दूर न केल्याने संताप व्यक्त
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक या दोघांच्याही बेजबाबदारपणावर या बैठकीतून जोरदार टीका करण्यात आली. दोन सदस्यीय समिती येणार हे माहित असतानाही त्रुटी दूर करण्यासंदर्भात कारवाई न झाल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. या दोघांविरोधात कारवाई व्हावी, असाही सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. ८ मेपासून धरणे आंदोलन, निदर्शने संपूर्ण जिल्ह्यात करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.