आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:आरक्षण गेले, वीजसंकट राज्यामुळे; खापर केंद्रावर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे खडे बोल

परभणी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून न्यायालय राज्य सरकारकडे इम्पिरिकल डेटाची मागणी करत आहे. परंतु, या सरकारने २ वर्षांत हा डेटा जमवला नाही. ते आता सात महिन्यांत काय जमवणार आहेत. हेतुपुरस्सर मराठा समाजाचे आरक्षण बुडवले गेले. आता ओबीसींचे आरक्षणही घालवण्यात आले. हे सरकार एकही काम करीत नाही. वीज संकटही याच सरकारमुळे निर्माण झाले. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकारला अपयश आले. पण खापर मात्र केंद्र सरकारवर फोडले जात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

परभणी येथे संजीवनी मित्रमंडळातर्फे स्व.अॅड.शेषराव भरोसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले की, मागच्या वर्षी ५७ मेट्रिक टन कोळसा राज्याला दिला होता. या वेळी ७५ मेट्रिक टन कोळसा राज्याला अधिक दिला, पण या वेळी विजेची मागणी अधिक आहे. आम्ही जानेवारीत कोळसा उचला म्हणून राज्य सरकारला पत्र दिले होते. पण, त्यांनी कोळसा उचलला नाही. कोळशाची राज्य सरकारकडे ३ हजार कोटी रुपयांची बाकी आहे. पण, पैसे दिले नाही म्हणून आम्ही कोळसा रोखला नाही. उलट एक हजार पॅसेंजर ट्रेन रद्द करून आम्ही त्या ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी लावलेल्या आहेत. वीज पुरवणे हे राज्य सरकारचे काम आहे, केंद्र सरकारचे नाही.

कोळसा पुरवणे एवढेच काम केंद्राचे आहे. तो आम्ही पुरवतोय, तर राज्याच्या ढिसाळ नियोजनामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकार आणि रेल्वे विभाग शेतकऱ्यांच्या सोबत असून कृषी क्षेत्रातील उत्पादने वाहून नेण्यासाठी केंद्र सरकारने मोठी सबसिडी दिली असल्याचे दानवे म्हणाले. शिवाय कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी अतिशय आवश्यक असून यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन ऊर्जा मिळते, तसेच येथून शेतकऱ्यांनी शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, त्याचा शेतीवर उपयोग करावा आणि कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी माजी आमदार मोहन फड, आमदार मेघना बोर्डीकर, भाजपचे परभणी महानगराध्यक्ष आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती.

रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हातात ट्रॅक्टरचे स्टिअरिंग
कृषी महोत्सवास भेट देत रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरून पाहिले. प्रत्येक स्टॉलवर भेट देत वेगवेगळी कृषी अवजारे, बी-बियाणे, संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली. कृषी प्रदर्शनात असलेल्या एका गांडूळ खताच्या स्टॉलला भेट देत स्वतःच्या शेतीसाठी गांडूळ खत खरेदी केले. त्याचबरोबर दानवे यांना कृषी महोत्सवात ट्रॅक्टर चालवण्याचा मोह आवरला नाही.

बातम्या आणखी आहेत...