आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीतील तरुणीने घराच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली आहे. भूमी सोनवणे (वय -१९, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
भूमी बारावीत शिकत होती तर तिचे वडील व्यावासायिक आहेत. बारावीचे वर्ष असल्याने तिला वडिलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असे सांगितले होते. सारखा मोबाइल पाहू नको, असे तिला वडिल रागावले होते. वडील रागावल्याने भूमी हिने रात्री इमारतीच्या छतावर जाऊन थेट खाली उडी मारून आत्महत्या केली.
सकाळी भूमी इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे सोनवणे कुटुंबीयांनी पाहिल्यावर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी घोडेगाव पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
येरवडा भागात गुंडांची दहशत, वाहनाची तोडफोड
पुणे शहरातील येरवडा भागात एका टोळक्याने दहशत माजवून रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. येरवड्यातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी तलवारी उगारून परिसरात दहशत माजविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत शंकर मानू चव्हाण (वय -५५, रा. येरवडा,पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवड्यातील पांडू लमाण वस्तीत माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या परिसरात तक्रारदार शंकर चव्हाण राहायला आहेत. पहाटे आरोपींनी चव्हाण यांची मोटार आणि वाहनांची तोडफोड केली. तलवारी उगारून दहशत माजविली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळके कैद झाले आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पांडू लमाण वस्तीत दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. वैमनस्यातून वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शंकर चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराच बदला घेण्यासाठी दहा जणांनी सुभाष उर्फ पापा किसन राठोड (वय ४१) आणि अनिल उर्फ पोपट भीमराव वालेकर (वय ३५) यांचा खून केला होता. दुहेरी खून प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. या प्रकरणात शंकर चव्हाण आणि त्यांच्या मुलाला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. सुभाष राठोड टोळीतील साथीदारांनी चव्हाण यांची मोटार तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.