आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी रॅकेट:14 लाखांच्या आमिषाने कोल्हापुरातील महिलेची किडनी काढली; नंतर पुण्यात अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपण

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर येथील महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटासोबत आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा किडनी तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रुबी हॉलनेही या प्रकाराबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे.

सारिका गंगाधर सुतार ही कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षांपूर्वीच तिची साथ सोडली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ती तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एका महिलेने तिची रविभाऊ नावाच्या एजंटाशी ओळख करून दिली. या एजंटाने पैशाच्या बदल्यात तिची किडनी पुण्यातील साळुंके नावाच्या व्यक्तीला विकण्याचा प्रस्ताव दिला. यासाठी १५ लाख रुपये मिळतील, असे आश्वासन दिले.

त्यावर सारिकाने किडनी देण्यास होकार दिला. दरम्यान वर्षभरापासून सारिका पुण्यात येत होती. तिच्या रक्तगटही साळुंके नावाच्या व्यक्तीसोबत जुळला. किडनीचा हा तोंडी व्यवहार एजंटामार्फत झाला होता. मात्र किडनी जवळच्या नातेवाइकांना देण्यात येते. यासाठी सारिका हिला साळुंकेची पत्नी दर्शवण्यासाठी आवश्यक बनावट कागदपत्रे बनवण्यात आली.

त्यात सारिकाचे नाव शोभा साळुंके असे दाखवले. त्यांनी तसे लेखी संबंधित किडनी प्रत्यारोपण समितीकडेही कबूल केले. गेल्या आठवड्यात सारिकाची किडनी काढून एका १९ वर्षीय तरुणीला देण्यात आली. त्या तरुणीच्या आईची किडनी साळुंकेला प्रत्यारोपित करण्यात आली.

एजंटाशी आर्थिक व्यवहार फिसकटल्याने प्रकार उजेडात
दरम्यान, रुग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पिटलमध्ये सारिकाची विचारपूस करण्यासाठी येत-जात होती. एजंटाने रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेतल्याचे सारिका यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. किडनी प्रत्यारोपणानंतर सारिकाने तिच्या बहिणीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का, अशी विचारणा केली. त्यावर रवीभाऊने केवळ ४ लाख रुपये देण्याचे मान्य केल्याचे सांगितले. परंतु, ठरल्याप्रमाणे १५ लाख रुपये न मिळाल्याने त्यांच्यातील तोंडी व्यवहार फिसकटला. त्यानंतर सारिका व नातेवाइकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्रकरणावर ससूनकडून अभिप्राय मागवला
चुकीच्या पद्धतीने किडनी प्रत्यारोपण झाल्याबाबत आमच्या पोलिस ठाण्याला तक्रार अर्ज आला आहे. ह्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. हे प्रकरण सध्या ससून रुग्णालयाच्या समितीकडे तसेच पुणे आरोग्य उपसंचालकांकडे अभिप्रायासाठी पाठवले आहे. त्यांच्या अभिप्रायानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. - विनायक वेताळ, वरिष्ठ निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे.

आमच्या स्तरावर निर्णय घेऊ शकत नाही
आम्हाला पोलिसांकडून किडनी प्रकरणात अभिप्राय देण्यासंबधी मागणी केली आहे. मात्र हे प्रकरण पाहता याबाबतचा निर्णय आमच्या स्तरावर घेऊ शकत नसल्याने आम्ही ते प्रकरण राज्याच्या आरोग्य सहायक संचालकांकडे पाठविले आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. - डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ.

किडनी स्वॅपिंगचे प्रकरण
हे प्रकरण किडनी प्रत्यारोपण स्वॅपिंग प्रकरणातील आहे. यामध्ये संबंधित महिलेने एका तरुणीला किडनी दिली व त्या तरुणीच्या आईने या महिलेने तिचा पती म्हणून दाखवलेल्या व्यक्तीला किडनी दिली आहे. मात्र, तिने नंतर तो तिचा पती नाही आणि कबूल केलेले पैसे दिले नाहीत म्हणून पोलिसांत तक्रार दिली. हे आम्हाला कळल्यावर आम्हीदेखील हॉस्पिटलची फसवणूक झाल्याची या महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणात हॉस्पिटलकडून व ससून रुग्णालयाच्या विभागीय समितीकडून सर्व कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली आहे. यामध्ये हॉस्पिटलचा कोणताही दोष नाही. - अ‍ॅड. मंजूषा कुलकर्णी, विधी सल्लागार, रुबी हॉल क्लिनिक

बातम्या आणखी आहेत...