आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात लवकरच उभारला जाईल. याचे काम पूर्ण झाले आहे. हा पुतळा विद्यापीठात एका चबुतऱ्यावर प्रस्थापित केला जाणार असून चबुतऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुतळा विद्यापीठात आणला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी हा पुतळा घडवला. दिल्ली येथील सुतार यांच्या कला स्टुडिओत पुतळा पूर्ण करण्यात आला. आता विद्यापीठाकडून पुतळा पाठवण्याची सूचना मिळण्याचा अवकाश आहे. आम्ही त्वरित पुतळा पाठवण्याच्या तयारीत आहोत, अशी माहिती अनिल सुतार यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा घडवण्याची जबाबदारी सुमारे अडीच वर्षांपूर्वीच आम्हाला दिली. सुरुवातीला पुतळा अश्वारूढ स्वरूपाचा होता. नंतर त्यात बदल करून पूर्णाकृती घडवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा १५ फूट उंच पुतळा ब्राँझमध्ये घडवण्यात आला. त्यापूर्वी याचे ३ फूट आकाराचे क्ले माॅडेल तयार केले. त्याची विद्यापीठ, संबंधित तज्ज्ञांमार्फत छाननी करून काही बदल केले व अंतिम क्ले माॅडेल सुनिश्चित करण्यात आले. त्याची १५ फूट उंच क्ले माॅडेल रेप्लिका तयार करून साचे घडवण्यात आले. नंतर ब्राँझमध्ये कास्टिंग केले, असे मूर्तिकार राम सुतार यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर ही ऐतिहासिक महान व्यक्तिरेखा आहे. अहिल्यदेवींनी आपल्या ओंजळीमध्ये शिवपिंडी घेतली आहे. देवींच्या मनातील अपार भक्तिभाव, पावित्र्य, शांतता... हे सारे त्यांच्या श्रद्धावान देहबोलीतून सहज प्रकट होत आहे. अहिल्यादेवींच्या मनातली शांतता, स्थिरता जणू पुतळ्यामध्ये उतरली आहे. परमईश्वरी तत्त्वाशी असलेले त्यांचे तादात्म्य पुतळ्याचे दर्शन घेताच पाहणाऱ्यांच्या मनातही जागे होईल, असा विश्वास मूर्तिकार म्हणून मला वाटतो, अशी भावना मूर्तिकार सुतार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
चेहऱ्यावरील भक्तियुक्त शांतता साकारणे आव्हानात्मक होते... राम सुतार म्हणाले की, अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावरील भक्तियुक्त शांतता साकारणे आव्हानात्मक होते. ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत आपल्याला काही तथ्ये परिचित असतात, पण शब्दरूपातून अशी तथ्ये पुतळ्यात स्थिर करायची असतात तेव्हा ते काम मूर्तिकाराची परीक्षा पाहणारे ठरते. हा पुतळा घडवताना मूर्तिकार म्हणून मी शांततेचा, श्रद्धेचा प्रवास केला. अपार शांतता, पावित्र्य, साधेपणा, जिव्हाळा आणि ज्ञाननिष्ठा विद्यापीठ परिसरातही अशी स्पंदने निर्माण करेल, अशी माझी प्रार्थना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.