आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवारांच्या राजीनामा नाट्यातून सावरलेल्या अजित पवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तांतर निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले आहे. पटोलेंनी मविआ सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आताचे शिंदे समर्थक १६ आमदार तेव्हाच अपात्र ठरले असते, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न विचारता पटोलेंनी राजीनामा देऊन टाकला. त्यानंतर लगेच अध्यक्षाची निवडणूक घेणे आवश्यक होते. पण तेही झाले नाही. १६ आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे येईल, हे माझे वैयक्तिक मत होते. त्यानुसारच न्यायालयाने निकाल दिला. त्याचे दूरगामी परिणाम देशभरात हाेतील अाणि पुढे अनेक गाेष्टी घडतील. पक्षांतरबंदी कायद्यास काही अर्थ राहणार की नाही हा प्रश्न अाता निर्माण झालेला अाहे. राजकीय पक्षांना संविधानाने ज्या गाेष्टी सांगितल्या त्यांचा अादर करून अशा प्रकारे गाेष्टी घडल्या तर त्यातून जनतेचा अपमान होऊ नये. सरकारला स्थिरता लाभली पाहिजे असे माझे मत अाहे.
सरकारच्या राजीनाम्याचे स्वप्न पाहू नये : उद्धव ठाकरेंना टोला
समजा न्यायालयाने अपात्र ठरवल्याने शिंदे-फडणवीस समर्थक १६ आमदार कमी झाले असते. तरीही फरक पडला नसता. पुरेसे संख्याबळ असल्याने सरकारला धोका नव्हता. १६ अामदार अपात्र घोषित झाल्यावर सध्याच्या सरकारने राजीनामा दिला असता असे कुणी स्वप्नातही वाटून घेऊ नये, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अजितदादांनी लगावला. उद्धव ठाकरेंना त्या वेळी जे योग्य वाटले ते त्यांनी केले. त्याबाबत आता मत व्यक्त करून उपयोग नाही. संख्याबळ नसल्याने राजीनामा देणारे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याच्या नेत्यांची उंची यात जमीन-अस्मानचा फरक आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
अजित पवारांनी चूक कबूल केली यातच सारेकाही आले
नागपूर | मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा संबंधितांना सांगूनच दिला होता. माझ्या राजीनाम्यानंतर मविआने नव्या अध्यक्षांची निवड केली नाही. ही चूकच झाल्याची कबुली अजित पवारांनी दिली. यातच सारेकाही आले, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
‘दिव्य मराठी’शी बोलताना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आणि झिरवाळांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहताना १६ आमदारांना अपात्र ठरवलेच आहे. मग अध्यक्षांचा प्रश्न येतोच कुठे? माझ्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने संग्राम थोपटेंचे नाव सुचवले होते. आमच्याकडे भरपूर उमेदवार होते, पण कोणाचीही निवड झाली नाही. ही मविआची चूक झाल्याचेच अजित पवारांनी कबूल केले. तरीही काही लोक अकारण माझ्यावर खापर फोडण्याचे काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना परत बोलावता आले असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यावर मी काहीही बोलू शकत नाही. हा त्यांचा प्रश्न आहे.
यापूर्वीही अजितदादा, पटोलेंमध्ये चकमकी
अजित पवार आणि नाना पटोलेंचे आधीपासूनच सख्य नाही. यापूर्वीही त्यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. पंधरवडाभरापूर्वी अजित पवारांची भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर लागल्यावर नानांनी त्यावर हल्ला केला होता.
सुषमा अंधारेंनी ठाकरे, दानवेंसमोर रडावे
उद्धवसेनेच्या उपनेत्या, अत्यंत आक्रमक वक्त्या सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमाेर रडण्यापेक्षा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमाेर रडले पाहिजे हाेते, असा सल्लाही अजित पवारांनी दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.