आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 26 नोव्हेंबरला 'संविधान दौड':परदेशी विद्यार्थ्यांसह 2 हजार विद्यार्थी धावणार, विजेत्यांसाठी पारितोषिकेही

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिनानिमित्त 'संविधान सन्मान दौड' चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबतच पन्नास हून अधिक परदेशी विद्यार्थी धावणार आहेत. या दौडला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याबाबतची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे संचालक डॉ.विजय खरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.खरे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या संविधानाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने या संविधान सन्मान दौडचे आयोजन केले आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून या दौडची सुरुवात होणार आहे. यावेळी चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या दौडला सकाळी 5.30 वाजता सुरुवात होईल.

वाडेकर म्हणाले, ही दौड तीन प्रकारच्या वयोगटानुसार आयोजित केली आहे. ज्यात 16 वर्षाखालील मुलामुलींसाठी 3 किलोमीटर, 20 वर्षाखालील मुलामुलींसाठी 5 किलोमीटर आणि खुल्या गटात सर्वांसाठी 10 किलोमीटर ची दौड असणार आहे. यामध्ये कमीत कमी तीन हजारपासून ते जास्तीत जास्त 15 हजारपर्यंत पारितोषिके देण्यात येणार आहेत. दौड पूर्ण झाल्यानंतर अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते लगेचच विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.

या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून दिनांक 24 नोव्हेंबर पर्यंत https://forms.gle/HNFJygxiJnBbGFTz9 या लिंक वर जात नावनोंदणी करावी असे आवाहन वाडेकर यांनी केले.

10 किलोमीटर प्रकारासाठी मार्ग

प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारती शेजारील संविधान स्तंभ -आयुका रोड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड- डावीकडे वळून राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडी येथे वळसा मारून - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड -येथून डावीकडे वळून -खडकी स्टेशन -उजवीकडे पार्क रोड वरून कालीबारी समिती -जनरल जोशी प्रवेशद्वार -विद्यापीठ लेडीज हॉस्टेल -डावीकडे वळून मुख्य प्रवेशद्वार -छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - मुख्य इमारत संविधान स्तंभ येथे समारोप.

बातम्या आणखी आहेत...