आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घाला:गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात 21 जणांचा मृत्यू, मुंबईत हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम

पुणे, मुंबई, नाशिक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून राज्यात इतर वेगवेगळ्या घटनांत २१ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यात मुंबई ३, पुण्यात २, नगरमध्ये ३ अमरावतीत १, नाशिकच्या मालेगावमध्ये १, अमरावतीत १ तर सोलापुरात ४ जणांचा बुडून मृत्यू झाला. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी रात्रीच्या सुमारास ५ मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. उर्वरित तीन जणांचा अग्निशमन दलाचे पथक शोध घेत आहे. व वर्सोवा येथे गणेश विसर्जनासाठी पाच जण समुद्रकिनारी गेले. या वेळी सर्वजण पाण्यात गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाले. रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध सुरू होता.

अमरावतीत एकाचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील १७ वर्षीय अरमान पठाण याचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले.

नगरमध्ये तीन चिमुरडे बुडाले
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्‍यातील कान्हेगाव येथे शेततलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलेली तीन मुले बुडून मरण पावल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. हे तिघे खेळण्यासाठी पाण्यात उतरले होते. मृत मुलांचे वय अनुक्रमे ४, ८ आणि १२ असे आहे.

इंद्रायणी नदीत दोघे बुडाले
पुणे | गणपती विसर्जनावेळी माेशी येथे इंद्रायणी नदीपात्रात दाेन जण बुडून मृत्यमुखी पडल्याची घटना घडली. प्रज्वल रघुनाथ काळे (१८) व दत्ता आबासाहेब ठाेंबरे (२०) अशी या मृतांची नावे आहेत. गणपती विर्सजनाच्या दिवशी प्रज्वल काळे व दत्ता ठाेंबरे हवालदार वस्ती आळंदी रस्ता येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात संध्याकाळी सहा वाजता गेले हाेते. त्यावेळी शिवाजी ठाेंबरे, नितीन अर्जुन ठाेंबरे , दत्ता आबासाहेब ठाेंबरे व प्रज्वल रघुनाथ काळे हे पाण्यात उतरले हाेते. नदीपात्रात मध्यभागी आल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रज्वल व दत्ता हे पाण्यात बुडू लागले आणि आरडाआेरड करू लागले. दरम्यान, पाण्याच्या खाेलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यु झाला. अग्निशामक दलास प्रज्वलचा मृतदेह रविवारी सापडला. मात्र, दत्ताचा शाेध साेमवारीही सुरू हाेता.

खान्देश : ४ मुलांसह ६ जणांचा बुडून मृत्यू
रविवारचा दिवस खान्देशवासीयांसाठी ‘काळ’ ठरला. जळगाव जिल्ह्यात चार बालकांचा बुडून मृत्यू झाला तर धुळे जिल्ह्यातील नगावबारी येथे एका प्रौढ गणेशभक्ताचा विसर्जनप्रसंगी तर नंदुरबार जिल्ह्यात एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी तितूर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या साहिल शाह शरीफ शाह फकीर (वय १६) आणि अयान शाह शरीफ शाह फकीर (वय १४) अशा दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. अयान पाण्यात बुडू लागल्याने साहिलने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र ते दोघे बुडाले. एकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी तर दुसऱ्याचा सोमवारी सकाळी तितूर नदीत सापडला. दुसरी घटना जामनेर तालुक्यातील जांभोळ येथे घडली. चिमुकल्या बहीण- भावाचा केटिवेअरमध्ये बुडून मृत्यू झाला. रुद्र गोरख जोशी (५) आणि त्याची बहीण मानवी नितीन जोशी (वय ७) हे दोघे घरी कोणीच नसल्याने शेजारी असलेल्या केटिवेअरमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

गणेश विसर्जनप्रसंगी प्रौढ खदानीत बुडाला. दरम्यान, शहादा तालुक्यातील करजई येथे शेळ्या चारत असताना तलावात पाय घसरून पडल्याने भिकेसिंग सरदारसिंग गिरासे (वय २१) याचा मृत्यू झाला. तो लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीत रोजंदारीने कामाला होता. रविवारी सुट्टी असल्याने तो शेळ्या चारण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. धुळ्यात संतोष आत्माराम शिरसाठ-कोळी (वय ४५, रा.नगावबारी) यांचा गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. उशिरा त्यांचा मृ़तदेह बाहेर काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...