आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिकूल परिस्थितीतही यंदा फळांच्या राजाने एकूण विक्रीतील उलाढाल समाधानकारक ठेवल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवात एकूण २.८० लाख डझन आंब्यांची विक्री झाली असून १७.०९ कोटींची उलाढाल झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांतली ही सर्वाधिक उलाढाल आहे.
राज्यात कृषी पणन मंडळाच्या वतीने यंदा सहा विभागांत आंबा महोत्सव घेण्यात आला. त्यात पुणे (मुख्यालय), पुणे शहर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरीचा समावेश होता. राज्यभरात एकूण १३ महोत्सव घेण्यात आले. त्यामध्ये ३६४ स्टाॅलधारकांचा समावेश होता, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
सर्वाधिक उलाढाल पुणे विभागात झाली. नाशिक येथील महोत्सवालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक येथील आंबा महोत्सवात १३१ स्टाॅल्सवरून १३ हजार डझन आंबा विक्री झाली. महोत्सवाला २२ हजार ४५० लोकांनी भेट दिली आणि ५८ लाख १५ हजारांची विक्री झाली. औरंगाबाद येथे २१ स्टाॅल्सवरून ९ हजार ५५ डझन आंबा विक्री झाली. एकूण २ हजार ८५० लोकांनी भेट दिली आणि सुमारे ४० लाखांची विक्री झाली.
राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवाची अधिकृत सांगता झाल्याचे सांगून सुनील पवार म्हणाले, ‘उत्पादक आणि थेट ग्राहक असा सेतू जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. यंदा १ एप्रिल ते ५ जून या काळात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. मार्च एप्रिल यादरम्यान आवक कमी असल्याने दर ७०० ते १२०० प्रतिडझन होते. मे महिन्यात आवक वाढल्यावर दर ५०० ते ८०० यादरम्यान होते. आंबा महोत्सवाचा प्रतिसाद वाढत असल्याने उत्पादकांच्या सोयीसाठी पणन मंडळाने पोर्टल विकसित केले होते. त्यावरून ४०० उत्पादकांनी नोंदणी केली. कोरोना संसर्ग काळात २०२० मध्ये ६५ हजार डझन आंबा विक्री होऊन ३.९० कोटींची उलाढाल झाली होती.
थेट ग्राहकापर्यंत पाेहाेचता येते
मी गेल्या १५ वर्षांपासून आंबा विक्री करत आहे. या महोत्सवात उत्पादकाला थेट ग्राहकापर्यंत पोचता येते. कुणीही मध्यस्थ नसतो. खात्रीची बाजारपेठ मिळाली. मी १२०० पेट्या विकल्या.
गोपीनाथ पुजारे, आंबा उत्पादक, देवगड, जि. सिंधुदुर्ग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.