आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 29 Infected Livestock Deaths Of Bovine Species In 18 Districts Of Maharashtra State Declared 'controlled Area'; Step To Prevent 'Lumpi'

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात 29 बाधित पशूंचा मृत्यू:संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित; 'लंपी'ला रोखण्यासाठी पाऊल

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.

शासनाने 8 सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यामध्ये 8 सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे.

राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केल्याने, लंपी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येणार आहे.

गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...