आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासात 3 नवी नाट्यगृहे, 3 कलादालने, रंगमंच, 100 कोटींची योजना मंजूर, पुनर्विकास योजनेवर मतमतांतरे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याची सांस्कृतिक राजधानी हे बिरुद सार्थ करणाऱ्या पुण्याचे सांस्कृतिक वैभव असणारी ‘बालगंधर्व रंगमंदिरा’ची वास्तू जमीनदोस्त करून त्या जागी टोलेजंग नवी इमारत ‘पुनर्विकासा’च्या नावाखाली उभारण्यात येणार हे आता स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत बालगंध‌र्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब केले.

‘बालगंध‌र्व रंगमंदिर ही केवळ एक वास्तू नसून तो सांस्कृतिक ठेवा आहे. केवळ पुणेकरांच्याच नव्हे, तर राज्यातील सर्व कलाकारांच्या मनात ‘बालगंध‌र्व रंगमंदिरा’साठी खास जागा आहे. विशेष भावना आहेत. त्यामुळे अशी जिव्हाळ्याची वास्तू पाडली जाणे कलाकारांसाठी दुखावणारे आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी वास्तू पाडण्याला विरोध दर्शवला आहे. बहुतेक कलाकार आता कुठल्या तरी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत असल्याने आपसूकच राजकीय पक्षांनीही ‘बालगंधर्व’ प्रकरणात उडी घेत या विषयाची व्याप्ती वाढवली आहे. पुण्याच्या राजकारणात अद्याप फारसे स्थान नसलेल्या आम आदमी पार्टीच्या मंडळींनी तर बालगंधर्वच्या दारात सोमवारी आंदोलनही केले.

काय आहे पार्श्वभूमी : १९६२ मध्ये महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूची पायाभरणी स्वत: बालगंधर्वांच्या हस्ते झाली होती. उभारणीपूर्वी देशातील आणि विदेशांतील नाट्यगृहांचा पुलंनी बारकाईने अभ्यास करून या नियोजित नाट्यगृहाची संरचना तयार केली होती. प्रत्यक्ष बालगंध‌र्व रंगमंदिराची उभारणी १९६८ मध्ये पूर्ण झाली. दुर्दैवाने तेव्हा बालगंध‌र्व हयात नव्हते. यथावकाश पुलंच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनाचा देखणा सोहळा झाला व हे सर्व सुविधायुक्त आधुनिक नाट्यगृह रसिकांच्या सेवेत रुजू झाले. तेव्हापासून गेली ५४ वर्षे ही वास्तू कलाकार आणि रसिकांच्या मनात अढळस्थान मिळवून आहे. मूळ वास्तू पाडण्यात येणार असल्याने सातत्याने ५४ वर्षांचे नाते जुळलेल्या कलाकार, रसिकांच्या भावना तीव्र आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित स्कायवाॅक आणि पार्किंगच्या सोयीसाठीच बालगंधर्व जमीनदोस्त करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.

तीन नवी नाट्यगृहे, अनुक्रमे १ हजार, ५०० व ३०० प्रेक्षक क्षमता, १० हजार चौरस फुटांचे कलादालन, ५ हजार चौरस फुटांची दोन कलादालने, खुला रंगमंच, उपाहारगृह, ८०० दुचाकी व ३५० चारचाकींसाठीचे नवे वाहनतळ, पुनर्विकासासाठी २४ वास्तुविशारदांचे सादरीकरण, आठ वास्तुविशारदांची निवड.

लोकभावनेचाही विचार केला जाईल बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मंजूर केली आहे. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. एकूण खर्च १०० कोटींचा आहे. त्यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात तीन वर्षे टप्प्याटप्प्याने तरतूद केली जाईल. कलाकार व लोकभावनेचाही विचार केला जाईल. - विक्रमकुमार, आयुक्त, पुणे मनपा

बातम्या आणखी आहेत...