आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य साखर परिषदेत:उसाच्या बगॅसपासून 3 हजार 600 मेगावॅट ऊर्जानिर्मिती शक्य : पवार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राकडून इथेनॉल उत्पादनाची अंमलबजावणी संथ

औष्णिक ऊर्जा, सोलार ऊर्जा, हायड्रॉलिक ऊर्जा याद्वारे वीजनिर्मिती प्रामुख्याने होत आहे. विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत आहे. अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीज संकट जाणवते व त्याचा परिणाम उद्योगावर होत आहे. २५ हजार ५०० मेगावॅटपर्यंत महावितरणकडे विजेची मागणी असून ७५ टक्के विजेची गरज ही औष्णिक ऊर्जेद्वारे भागवली जाते. कोळशाचा तुटवडा असल्याने त्याची पूर्तता करणे अशक्य होत आहे. त्यामुळे खुल्या बाजारातून चढ्या दराने वीज खरेदी करावी लागते. राज्यात एक हजार लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप होत असून त्यातील बगॅसचे प्रमाण २८ टक्के असते. ३ हजार ६०० मेगावॅट वीजनिर्मिती या बगॅसपासून होऊ शकते. तीन वर्षांत १३५० मेगावॅट ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयाेजित राज्य साखर परिषदेत ते शनिवारी बोलत होते. या वेळी पवार म्हणाले, साखर कारखान्यांच्या रिकाम्या जागेवर सोलार ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, सरकारने त्यास सहकार्य करावे. साखर कारखान्यांचे छप्पर तसेच गाेदामाचे छप्पर या ठिकाणीही सोलार पॅनल बसवून ऊर्जानिर्मिती करता येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत असून त्यादृष्टीने विचार करण्यात यावा. भारताची इंधनाची आयात ५५ हजार अब्ज डॉलर होती. भारताने ही आयात दहा टक्के कमी करण्याचे ठरवले आहे. कारण ७५ टक्के इंधन आयात करावे लागते. इथेनॉलचा वापर आगामी काळात वाढवावा लागणार आहे. त्याकरिता बँकांनी मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. केंद्र सरकारची इथेनॉल उत्पादनाबाबत सकारात्मकता असली तरी अंमलबजावणीबाबत हालचाली दिसून येत नाहीत, असे पवार म्हणाले. मराठवाड्यात उसाचे क्षेत्र वाढत असल्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे जालनाजवळ पाथरगाव येथे एक शाखा निर्माण करून १६० एकर जमीन खरेदी केली. त्या ठिकाणी यंदा ३५ एकर ऊस उत्पादन घेण्यात आले, पाण्यासाठी पाइपलाइनचे काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा : गडकरी
सध्या देश करत असलेली इंधनाची आयात कमी करण्यासाठी येणाऱ्या काळात पर्यायी इंधनाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. यावर इथेनॉल हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आता उसाचा रस, शुगरकेन सिरपपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली आहे. शेतकरी व साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. इथेनॉलप्रमाणेच ग्रीन हायड्रोजन हेदेखील आपले भविष्य ठरू शकते. कारखान्यांना ग्रीन हायड्रोजन निर्मितीतूनही उत्पन्न मिळू शकते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने या सर्व पर्यायांचा विचार करून ते लोकांसमोर आणावेत, असे मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

साखर उद्योगासाठी दूरगामी धोरण आखावे : मुख्यमंत्री
केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखर परिषदेत केले. ठाकरे म्हणाले, साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून मार्गदर्शन करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...