आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:पुण्यातील वाघोलीमध्ये मंडप व्यावसायिकाच्या गोदामात आग लागून 3 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
45 सिलिंडरचे एकाचवेळी भीषण स्फोट - Divya Marathi
45 सिलिंडरचे एकाचवेळी भीषण स्फोट

वाघोलीतील उबाळेनगर परिसरात मंडप व्यावसायिकाच्या गोदामात मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. गोदामात ठेवलेल्या ४५ सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बिजेन पात्रा (वय २८), विश्वास सेन (वय ३३), कमल (वय २९, तिघे रा. मैथनीपूर, पश्चिम बंगाल) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात उबाळेनगर भागात शुभ्र सजावट मंडप साहित्य केंद्राचे गोदाम आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास गोदामात बारा कामगार जेवण करत होते. अचानक आग लागल्याने कामगार बाहेर पळाले. कामगार बिजेन पात्रा, विश्वास सेन आणि कमल गोदामात आग लागल्यानंतर अडकून पडले. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. गोदामात रंगकाम सुरू असल्याने तेथे रंग तसेच रसायने ठेवण्यात आली होती.

रसायनांनी पेट घेतल्याने आग भडकली. गोदामात तीन इ-रिक्षा ठेवण्यात आल्या हाेत्या. गोदामात ४५ छोटे सिलिंडर ठेवण्यात आले होते. सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला.

गोदामाच्या पाठीमागील बाजूस इंडेन कंपनीचे गॅस गोदाम आहे. आग भडकल्यास त्याची झळ सिलिंडरच्या गोदामाला पोहचण्याची शक्यता होती तसेच याच परिसरात रहिवासी इमारती असल्याने जवानांनी सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील रहिवाशांना घराबाहेर थांबण्यास सांगितले. तासाभरानंतर जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीमागचे कारण समजू शकले नसून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.