आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:‘म्हाडा’त स्थापत्य अभियंत्यासाठी 30, तर कनिष्ठ लिपिकासाठी 12 लाखांची मागणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘म्हाडा’त नोकरी हवी असल्यास स्थापत्य अभियंता पदासाठी ३० लाख, तर कनिष्ठ लिपिक पदासाठी १२ लाख रुपये लागतील अशी मागणी अटकेतील अॅड. विजय दर्जी याने उमेदवारांकडे केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयास दिली. दर्जीची कारागृहात रवानगी केली आहे.

अॅड. दर्जी याला पोलिसांनी २६ मे रोजी जळगावातून अटक केली होती. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेला संशयित राजेंद्र सानप याच्या संपर्कात दर्जी असल्याचे तपासात आढळून आल्यानंतर त्याला अटक केली. ६ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला बुधवारी कोर्टात हजर केले. कोठडीत असताना पोलिसांनी दर्जीकडून माहिती घेतली. सानपसह आणखी काही संशयित व उमेदवारांच्या संपर्कात दर्जी होता. त्याच्याकडे म्हाडा व आरोग्य विभागाच्या परीक्षेचे प्रत्येकी एका उमेदवाराचे हॉल तिकीट आढळले.

गुन्ह्याची व्याप्ती वाढणार : म्हाडा, आरोग्य व टीईटी परीक्षांच्या घोटाळ्यात जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची नावे आता पोलिसांकडे आहेत. या गुन्ह्यात नवीन संशयित समोर येण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना जळगावात बोलावत केली पैशाची मागणी
दर्जीने बालाजी जॉब प्लेसमेंट कार्यालयातून म्हाडाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना फोन करून जळगावात बोलावत पदांसाठी पैसे लागतील, असे सांगितले. यानंतर दर्जीसह त्याचा भाऊ पद्माकर दर्जीने उमेदवारांचे हॉल तिकीट सानपला पाठवले. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरमार्गाने मिळवत विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. या कारणांसाठी दर्जीच्या तीन दिवसांच्या कोठडीची मागणी सरकार पक्षाने न्यायालयात केली होती.

बातम्या आणखी आहेत...