आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठाला 33 लाखांना गंडवले:बांधकाम कंपनीतील गुंतवणुकीवर दामदुप्पट रकमेच्या आमिषाची मारली होती थाप

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणुक केल्यास ठराविक कालावधी नंतर दुप्पट रक्कम मिळेल असे अमिष दाखवून बँकेतून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींवर हिंजवडी पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली आहे.

याबाबत अंबरनाथ रामभाऊ झरेकर (वय- 71, रा. हडपसर,पुणे) यांनी आराेपी विराेधात पाेलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार, वृषभ राजेंद्र पवार (वय- 27,रा. बावधन, पुणे) व राजेंद्र दुर्गा पवार (53, रा. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2020 ते आतापर्यंत घडलेला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंबरनाथ झरेकर हे एका नामांकित बँकेतून कर्मचारी म्हणून निवृत्त झालेले आहे. त्यांना संशयित आराेपी राजेंद्र पवार यांनी त्यांच्याकडील राेशनी कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणुक केल्यास सहा महिन्यात दुप्पट रक्कम देताे असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानुसार, तक्रारदार यांनी त्यांचे सेवानिवृत्तीचे 33 लाख रुपये कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणुक करण्यास आराेपीने सांगुन ते पैसे त्यांचा मुलगा वृषभ पवार याचे पवार कन्सलटंसी सर्व्हिसेस या नावाने असलेल्या बँक खात्यावर आरटीजीएस करण्यास लावले.

यानंतर संबंधित गुंतवणूक केलेल्या रकमेचे परताव्यासह 66 लाख रुपये तक्रारदार यांना परत न करता त्यांची फसवणुक करुन सदर पैशाचा अपहार करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस खारगे करत आहे.

पेटीएमवर ऑफर सांगून फसवणूक

पुण्यातील वडगावशेरी परिसरातील एका दुकानदारास भामट्यांनी पेटीएमवर साऊंड बाॅक्सची ऑफर असल्याचे सांगत भामट्यांनी 35 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी चंदननगर पाेलिस ठाण्यात एका किराणा दुकानदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार, आराेपी अजितकुमार अक्षयकुमार पटनाईक (वय- 33, रा. चंदननगर, पुणे) यास पाेलिसांनी अटक केली. हा प्रकार 22 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2022 दरम्यान घडला.

तक्रारदार यांचे किराणा दुकान असून अजितकुमार याने दुकानात येऊन पेटीएमवर साऊंड बाॅक्सवर ऑफर असल्याचे सांगितले. जुन्या साऊंड बाॅक्सवर नवीन साऊंड बाॅक्स देताे असे सांगत दुकानदाराचा विश्वास संपादन करुन, त्यांचा माेबाईल स्वत:कडे घेत पेटीएम पाेस्टपेड कार्ड मधून परस्पर 35 हजार रुपये स्वत:चे खात्यावर वळवून फसवणुक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...