आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा कहर:कोरोनाने घेतला राज्यातील 36 तज्ज्ञ डॉक्टरांचा बळी, डॉक्टरांची शिखर संघटना आयएमएची माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राकडे आकडेवारी नाही हे खेदजनक - डॉ. राजन शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे महाराष्ट्रातील ३६ कोरोना योद्धे डॉक्टर कोरोनाच्या महामारीत स्वत:चा जीव गमावून बसले आहेत. त्यापैकी पुण्यातील चार डॉक्टरांचा समावेश असून देशात आतापर्यंत एकूण ३८२ डॉक्टर कोरोनाशी लढताना काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

रुग्णांना मरणाच्या लढाईतून बाहेर काढणारा डॉक्टर सर्व रुग्णांसाठी देवदूत आहेत. पण, कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर सध्या घोंगावत आहे. त्याच्या तावडीतून सर्वसामान्यच नव्हे तर डॉक्टरदेखील सुटलेले नाहीत. यात पुण्यासह मुंबई, धुळे, अकोला, भिवंडी, रत्नागिरी, कल्याण येथील डॉक्टरांचा समावेश आहे. त्यांची यादी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या शिखर संघटनेने तयार केली आहे, अशी माहिती आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

देशामध्ये तामिळनाडूतील संख्या सर्वाधिक : कोरोनाच्या काळात देशात सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू तामिळनाडू राज्यात झाले असून त्यांची संख्या ६२ इतकी आहे. त्या खालोखाल आंध्र प्रदेश ४२, कर्नाटक ४१, गुजरात ३६, पश्चिम बंगाल २७ या राज्यात २०८ डॉक्टरांनी जीव गमावला आहे. तर, उरलेले १७४ डॉक्टर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंंगण, राजस्थान, ओडिशा, पंजाब, दिल्ली, या व इतर राज्यांतील १७४ जण प्राणास मुकले आहेत. मृत्यू झालेल्या डॉक्टरांमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर एमबीबीएस, निवासी डॉक्टर, एमडी, फिजिशियन, आर्थोपेडिक, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूल तज्ञ या डॉक्टरांचा देखील समावेश होता, असेही यात सांगण्यात आले आहे.

केंद्राकडे आकडेवारी नाही हे खेदजनक

इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. मात्र, केंद्र शासनाकडे त्याची आकडेवारीदेखील नाही ही खेदाची बाब आहे. ही बाब म्हणजे डॉक्टरांना कोरोनायोद्धे म्हणून संबोधन करून त्यांची थट्टा करण्यासारखे आहे. डॉक्टर किंवा आरोग्य सेवा देणारे कर्मचारी कोरोना काळात राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना ते बाधित होतात आणि ताे संसर्ग घरी देखील घेऊन येतात. ज्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांना हुतात्मा दर्जा शासनाने द्यावा आणि त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ द्यावा. डॉ. राजन शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए