आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:'तुझे माझे जमेना..' पती-पत्नी वादाच्या दररोज 40 तक्रारी

पुणे (मंगेश फल्ले)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ समजूत काढण्यास कमी पडत असल्याने पुणे पोलिसांकडे समुपदेशकाची जबाबदारी

वाढत्या नागरीकरणामुळे अनेक कुटुंबे ग्रामीण भाग साेडून माेठ्या शहरांकडे कामाच्या निमित्ताने स्थलांतर करत आहेत. नाेकरीच्या कारणाने स्वतंत्र राहण्यास नवीन जाेडपी प्राधान्य देत असल्याने विभक्त कुटुंब पद्धतीत मागील काही वर्षांत वाढ हाेत अाहे. पती अाणि पत्नी दाेघे नाेकरदार असतील तर घरातील कामावरून किंवा क्षुल्लक कारणावरून खटके उडून वाद हाेण्याच्या प्रमाणात वाढ हाेत असून पाेलिसांकडे दांपत्याच्या तक्रारींचा अाेघ वाढत अाहे. पती-पत्नीच्या वादात समजूत काढण्यास सासू-सासरे, आई-वडिलांची कमतरता भासत असल्याने पाेलिसांना समुपदेशकांच्या माध्यमातून दांपत्याची समजूत काढावी लागत आहे.

पुणे पाेलिसांच्या भराेसा सेलकडे दरराेज ३० ते ४० दांपत्यांच्या वादाच्या तक्रारी येत अाहेत. लाॅकडाऊनदरम्यान अनेक दिवस ‘वर्क फ्राॅम हाेम’ असल्याने पती-पत्नीत वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. पती अाणि पत्नी दाेघे नाेकरी करत असल्याने दाेघांच्या कामाच्या जबाबदाऱ्यामुळे नाेकरदार वर्गात ताणतणाव जास्त दिसून येत आहे. अायटीसारख्या क्षेत्रात काम करणारे दांपत्य स्वच्छंदी जीवनास अधिक प्रमाणात प्राधान्य देत असल्याने पार्टी, भटकंती, माैजमजेच्या कारणामुळे कुटुंबापासून दुरावत अाहेत. नाेकरदार वर्गात पती-पत्नी कमावत असल्याने एखाद्या किरकाेळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोघेही माघार घेण्यास तयार नसल्याने दांपत्यामधील दुरावा वाढत अाहे. अशाप्रसंगी सासू-सासरे जवळ नसल्याने समजावून सांगणारे काेणी नसते अाणि वाद विकाेपाला जाऊन घटस्फाेटापर्यंत प्रकरण पाेहोचत अाहे. वेगवेगळया वेबसाइटच्या माध्यमातून अाॅनलाइन वर-वधू शाेधून लग्न करण्याचे प्रकार शहरी भागात वाढत अाहेत. दाेघांनी एकमेकांना समजण्यास पुरेसा अवधी न देता अल्पावधीत लग्न केल्याने काैटुंबिक समस्या वाढत असल्याचेही समुपदेशकांना जाणवत अाहे. तसेच मुलांच्या ऑनलाइन शाळा असल्यानेदेखील त्यांच्याकडेही पालकांना लक्ष द्यावे लागत असल्याने वाद होत आहेत.

सुशिक्षित नाेकरदारांच्या तक्रारीच अधिक
भराेसा सेलच्या सहायक पाेलिस निरीक्षक सुजाता शानमे म्हणाल्या, २०१९ मध्ये भराेसा सेलकडे दाेन हजार ८०८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी दाेन हजार ६४ तक्रारी महिलांच्या, तर ५४४ तक्रारी पुरुषांच्या हाेत्या. २०२० मध्ये दाेन हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील १२०३ महिलांच्या अाणि ७९७ पुरुषांच्या तक्रारी अाहेत. लग्न झाल्यानंतर १५ दिवसांपासून दाेन ते तीन वर्षांपर्यंत जाेडप्यांच्या तक्रारींची संख्या प्रामुख्याने अाहे. १४ समुपदेशकांच्या मदतीने दांपत्यांना समजून घेत त्यांच्यातील वाद सामंजस्याने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येताे. सुशिक्षित नाेकरदार दांपत्यांच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असून किरकाेळ कारणावरून वाद विकाेपाला जात असल्याचे दिसून येत अाहे.

बातम्या आणखी आहेत...