आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्राचे आयटी हब म्हणून आेळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा परिसरातील नामांकित कंपन्यांत काम करत असलेल्या सुमारे ४५ हजार कर्मचाऱ्यांना नाेकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. काेराेनाच्या काळात दुसऱ्या कंपनीत नाेकरी मिळत नसल्याने आयटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर प्रसिद्ध आयटी कंपन्यांच्या दरवर्षीच्या आर्थिक उलाढालीत किंवा कामाच्या मागणीत कुठेही घट झालेली नसतानाही कर्मचाऱ्यांची २० ते ५० टक्क्यांपर्यंत पगार कपात केल्याने त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेसेन्ट इन्फर्मेशन टेक्नॉलाॅजी एम्प्लॉइज सिनेट (निटस) या महाराष्ट्रातील आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडे २३ हजार कर्मचाऱ्यांनी पगार कपातीच्या तक्रारी केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हरप्रीत सलुजा यांनी दिली.
सलुजा म्हणाले, एप्रिलपासून आतापर्यंत निटसकडे ७८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे नाेकरी कंपनीने संपवणे, वेतन कमी करणे, राजीनाम्यासाठी दबाव आणणे, सुटीमध्ये कपात करणे, मातृत्व लाभ न देणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रसिद्ध टाटा टेक्नाॅलाॅजी, विप्राे, टेक महिंद्रा, केप जेमिनी अशासारख्या नामांकित कंपन्यांत कर्मचारी कपात माेठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. वर्क फ्राॅम हाेमची सुविधा कर्मचाऱ्यांना आयटी कंपनीने दिली आहे, परंतु त्यामुळे कामाचे तास वाढूनही आेव्हरटाइम दिला जात नाही. रात्रपाळीचा भत्ता देण्यात येत नाही. कामासाठी लागणाऱ्या विजेचा भार कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडताे. वायफायचा खर्चामध्ये वाढ झाली आहे. काही कंपन्या व माेठ्या एमएनसी कर्मचाऱ्यांचे शाेषण करतात व काॅर्पाेरेट ब्रँड नेम, जबाबदारी, पदाेन्नतीची संधी आणि नाेकरीच्या स्थिरतेच्या नावाखाली अतिरिक्त तास काम करण्यास सांगतात. आयटी उद्याेगात काम करणारे कर्मचारी त्यांच्या कामाच्या सतत शारीरिक व मानसिक तणावामुळे बऱ्याच आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
नैराश्य, पाठीच्या आजारांचा अनेकांना सामना करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी कामास स्वतंत्र खाेली नसल्याने एकत्रित कुटुंबात काम करणे कर्मचाऱ्यांना अवघड बनत आहे. नाेकरी गमावणे, पगार कपातीमुळे घर-गाडीचे हप्ते, घरभाडे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, विमा सुविधा या गाेष्टींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागताे. दुसऱ्या ठिकाणी नाेकरी मिळत नसल्याने अनेकांचे पीएफचे पैसे खर्च हाेत आहेत. कामगार आयुक्तांकडे अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी कंपन्यांविराेधात तक्रारी केल्या आहेत. परंतु, कामगार आयुक्तांच्या नाेटिसीला आयटी कंपन्या केराची टाेपली दाखवत असल्याने कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही.
व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून नाेकरीच्या संधी
ज्या कर्मचाऱ्यांनी नाेकरी गमावली आहे किंवा ज्यांचा पगार निम्म्याने कमी झाला आहे अशा दीड ते दाेन हजार आयटी कर्मचाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला आहे. जे आयटी कर्मचारी वेगवेगळ्या कंपन्यांत काम करत आहेत त्या ठिकाणी नवीन कामाची भरती असल्यास त्याबाबतची माहिती सदर ग्रुपवर कळवली जाते. अशा प्रकारे कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात जवळपास ३५० ते ४०० जणांना विविध कंपन्यांत नाेकरी मिळाली आहे. तसेच आणखी काही जणांना मदत करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.