आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन:भिडेवाड्यावर सावि़त्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 50 कोटींची घोषणा, चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती, गड- किल्ले , इथली क्रांतीकारी व शैक्षणीक परंपरा हे आपले वैभव आहे. हे वैभव जपताना नवनवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रकात पाटील यांंच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाला मानवंदना

यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अनमोल मित्तल यांनी केले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, पुणे शहर गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- ११२ पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, पुणे मनपा अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल १०८ सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला. पोलीस वाहनांचे हस्तांतरण

जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात आलेल्या 24 चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण शहर पोलीस दलाला पालकमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकाधिक निधी देण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती, गड-किल्ले, सुधारक आणि क्रांतीकारी विचार, इथला इतिहास, शैक्षणिक परंपरा हे आपले वैभव आहे. हे वैभव जपताना समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवित राज्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाचा असून जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमीत्त तसेच कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, अमृतकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी; सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास; पायाभूत सुविधांचा विकास; सक्षम कुशल रोजगारक्षम युवा घडवणे आणि रोजगारनिर्मिती; पर्यावरणपूरक विकास ही ध्येये साध्य करण्यासाठी योग्य नियोजन समाविष्ट करण्यात आले.

५० कोटींचा निधी

जिल्ह्यातील पायाभूत विकासासह ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या हवेली तालुक्यातील तुळापूर आणि शिरुर तालुक्यातील समाधीस्थळ वढू (बु.) येथील स्मारकाच्या विकासकामांची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.