आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:उच्चभ्रू इमारतीत रेस्टॉरंट विकत घेण्याच्या बहाण्याने साडेपाच कोटीचा गंडा, बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कॅम्प परिसरातील उच्चभ्रू इमारतीत रेस्टॉरंट विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यवसायिकाची तब्बल साडेपाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

याबाबत प्रसाद यशवंत भिमाले (वय 41, राहणार, गुरुवार पेठ, पुणे) यांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुशील घनश्याम अग्रवाल (राहणार लुल्लानगर ,पुणे )आणि अल्नेश अकील सोमजी ( राहणार- बोट क्लब रोड ,पुणे )यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 21 /9 /2021 ते आत्तापर्यंत घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रसाद भिमाले हे बांधकाम व्यवसायिक असून ते आणि त्यांचा पुतण्या यांनी कॅम्प परिसरात बीएमडब्ल्यू शोरूमच्यावर गगन आयलँड टाऊनशिप याठिकाणी रेस्टॉरंट विकत घेण्यासाठी आरोपीं सोबत बोलणे केले होते. सदर आरोपी सुशील अग्रवाल आणि अल्नेश सोमजी यांनी सदर रेस्टॉरंट विकत देतो असे सांगितल्याने, त्यांच्यावर विश्वास ठेवून संबंधित प्रोजेक्ट करीता तक्रारदार यांनी दोन कोटी 62 लाख रुपये आरोपींच्या फॉर्मच्या खात्यावर पाठवले.

मात्र, त्यानंतर प्रकल्प पूर्ण झाला नाही म्हणून व्यवहार रद्द करून तसा करारनामा करण्यात आला. तसेच त्यानुसार ठरल्याप्रमाणे आरोपी सुशील अग्रवाल आणि अल्नेश सोमजी यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून साडेपाच कोटी रकमेचे कोटक महिंद्रा बँकेचे चार चेक घेण्यात आले. मात्र, आरोपींनी सदरचे कोरे चेकवर चुकीच्या सहया करून तसेच गुंतवणुकीची रक्कम परत न करता तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस शेळके पुढील तपास करत आहेत.