आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती.
त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने व आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागास 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर प्राप्त झालेला 60 कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत.
तसेच स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली होती. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्याशी याबाबत विविध बैठका करून याबाबत सुधारणा करायच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील विविध विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांच्या समवेत चर्चा व बैठक करून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध मुद्द्यांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी आयुक्त कार्यालयाने नुकत्याच शासनास सादर केलेल्या आहे. स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुलभता निर्माण होणार आहे व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे.राज्यात समाज कल्याण विभागामार्फत 441 शासकीय वसतिगृह कार्यरत असुन त्यामध्ये 50 हजार विद्यार्थींची शिक्षणाची सोय झाली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे . राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना रुपये 60 हजार ते 48 हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.
समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले की, समाज कल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण व यशस्वी योजना आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. तसेच योजनेमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.