आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई रकमेत वाढ:अपघातात मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना विमा कंपनीकडून 6.75 कोटींची भरपाई

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर लक्झरी बसच्या धडकेत मृत्युमुखी पडलेले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांच्या कुटुंबीयांना संबंधित बसचा विमा उतरवलेल्या कंपनीने मंगळवारी तब्बल पावणेसात कोटी रुपयांची भरपाई दिली. पुणे जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात न्यायाधिकरणात दाखल असलेल्या या दाव्यात ‘मध्यस्था’मार्फत तडजोड झाली. ‘मध्यस्था’च्या माध्यमातून एवढ्या मोठ्या रकमेची भरपाई देत निकाली निघालेले हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश व मोटार अपघात न्यायाधिकरणाचे अध्यक्ष एस. सी. चांडक आणि न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विमा कंपनीने भरपाई रकमेचा धनादेश खुर्जेकर कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

अपघातानंतर डॉ. खुर्जेकर यांच्या पत्नी, दोन मुली, आई-वडिलांनी संबंधित बसचा मालक आणि बसचा विमा उतरवलेल्या ‘इफ्को-टोकिओ’ कंपनीविरोधात मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. यात साडेतेरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागण्यात आली. तडजोडीत ६.७५ कोटी रु. निश्चित झाले.

अपघात विमा कवचामध्ये या चार गोष्टी आवश्यक ॲड. अतुल गुंजाळ यांच्या मते, एखाद्या अपघातात व्यक्ती मृत झाल्यानंतर विमा मिळण्यासाठी त्याचे वय, त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील लोक, त्यांचे वार्षिक उत्पन्न आणि भविष्यातील आर्थिक वाढ या चार गोष्टी आवश्यक ठरतात. त्यानुसारच नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते. या प्रकरणात खुर्जेकर यांचे वार्षिक उत्पन्न ३६ लाख रुपये होते. मरताना त्यांचे वय ४० वर्ष होते. त्यांच्यावर आई, पत्नी, दोन मुली अवलंबून होत्या. भविष्यातील ४० टक्के वाढ गृहीत धरून भरपाईची रक्कम नातेवाइकांना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...