आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यात एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मावळ अप्रीसर येथील कोठारणे गावातील या चिमुकलीची बलात्कारानंतर आरोपींनी निर्घृण हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपी तेजस दळवीला (वय 24) पकडले आहे. तसेच पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याप्रकरणी आरोपीची आई सुजाता दळवींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला असून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांकडून आंदोलने करण्यात येत आहे.
कामशेत येथील 7 वर्षीय मुलगी ही 2 ऑगस्टपासून बेपत्ता होती. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. पोलिस तिचा कसुन शोध घेत होते. अखेर बुधवारी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेमागे आक्षेपार्ह अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर या 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले.
आरोपी मुलीचा शेजारी
गावकऱ्यांचा रोष पाहता पोलिस कामाला लागले. आणि 24 तासांच्या आत आरोपी तेजस उर्फ बाबा दळवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी याबाबत माहिती दिली. मावळमधील एका बंगल्यातील कामगाराच्या संशयास्पद हालचालींवरुन दळवीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तेजस दळवी हा मुलीचा शेजारी असल्याची माहिती समोर आली आहे. पोक्सो कायद्यान्वये कलम 363, 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थ संतप्त
या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यातील लोक संतप्त झाले असून बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहेत. विद्यार्थी, नागरिक, महिलांतर्फे आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. तसेच सामाजिक संघटनांकडून शोक व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. लोकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे न्यायाची मागणी केली आहे. सोबतच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून खुनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. निष्पाप पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.